उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेने आपल्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चक्क राहत्या घराच्या बाथरूमच्या फरशांखाली गाडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे.

नेमकी घटना काय?

सुरेंद्र शर्मा (वय ४४) असे मृत पतीचे नाव असून, आरोपी पत्नीचे नाव रुबी शर्मा आहे. सुरेंद्र हे गेल्या काही काळापासून बेरोजगार होते आणि त्यांना दारूचे व्यसन होते. दारूसाठी ते सतत रुबीकडे पैशांची मागणी करायचे आणि पैसे न दिल्यास तिला मारहाण करायचे. त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. या त्रासाला कंटाळून रुबीने पतीचा काटा काढण्याचे ठरवले.

खिरीत दिल्या गुंगीच्या गोळ्या

१८ मे रोजी रुबीने पती सुरेंद्र यांच्यासाठी खिरीची वाटी तयार केली. मात्र, या खिरीत तिने मोठ्या प्रमाणात गुंगीच्या गोळ्या मिसळल्या. खीर खाल्ल्यानंतर सुरेंद्र बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. घरात दोन मुलीही होत्या, मात्र वडिलांना दारूच्या नशेत तासनतास झोपण्याची सवय असल्याने त्यांना काहीच संशय आला नाही.

बाथरूममध्येच बनवली कबर

दुसऱ्या दिवशी सकाळी रुबीने दोन्ही मुलींना त्यांच्या काकांच्या घरी सोडले. घरात कोणी नसताना तिने बाथरूमच्या जमिनीवर खड्डा खणला. त्यात पतीचा मृतदेह गाडून, त्यावर सिमेंटचे प्लास्टर केले आणि वरून नवीन फरशा बसवल्या, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली.

एटीएमच्या पैशांमुळे बिंग फुटले

२६ मे रोजी सुरेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, सुरेंद्र यांच्या भावाला अनिल शर्मा एक संशयास्पद गोष्ट आढळली. सुरेंद्र बेपत्ता असतानाही त्यांच्या पेन्शन खात्यातून एटीएमद्वारे सतत पैसे काढले जात होते. सुरेंद्र यांच्याकडेच एटीएम कार्ड असायचे. अनिल यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जेव्हा घरात जाऊन तपास केला, तेव्हा त्यांना बाथरूममधील नवीन फरशांवर संशय आला. पोलिसांनी तात्काळ त्या फरशा तोडल्या आणि आतून सुरेंद्र यांचा सांगाडा बाहेर काढला.

पोलिसांना दुसऱ्या कोणावर संशय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकटी महिला एवढं मोठं कृत्य करू शकत नाही, मृतदेह एकटीने गाडणे कठीण आहे. त्यामुळे या गुन्ह्यात रुबीला इतर कोणी मदत केली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.