उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या ४५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच घराच्या बाथरुममध्ये फरशीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ४४ वर्षीय सुरेंद्र कुमार शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या धक्कादायक हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र यांच्या पत्नीला, म्हणजेच रुबीला अटक केली आहे. आरोपी पत्नीने पतीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरुममध्ये खड्डा करून त्याचा मृतदेह गाडला आणि त्यावर नवीन फरशा बसवून घेतल्या होत्या.
असा उघडकीस आला गुन्हा
सुरेंद्र कुमार शर्मा हे १८ मे पासून अचानक बेपत्ता झाले होते. पती बेपत्ता झाल्यानंतर रुबीने स्वतः नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगितले की, ते कुठेतरी निघून गेले आहेत आणि लवकरच परत येतील. यानंतर २६ मे रोजी पोलिसांत ते बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवण्यात आली. कुटुंब आणि पोलीस सातत्याने सुरेंद्र यांचा शोध घेत होते, मात्र काहीच सुगावा लागत नव्हता.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना रुबीच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. शुक्रवारी पोलीस एका जुन्या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा त्यांच्या घरी पोहोचले असता, रुबीची वर्तणूक अत्यंत संशयास्पद वाटली. त्याच वेळी सुरेंद्र यांच्या भावाने पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. या संशयावरून पोलिसांनी घराची कसून झडती घेण्यास सुरुवात केली.
बाथरुममधील नवीन टाईल्समुळे संशय बळावला
झडतीदरम्यान पोलिसांचे लक्ष बाथरुममधील नव्याने बसवलेल्या फरशा आणि प्लास्टरकडे गेले. संपूर्ण घरात फक्त बाथरुमचाच भाग नवीन दुरुस्त केलेला पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ मजूर बोलावून बाथरुमची ती नवी फरशी तोडून खोदकाम सुरू केले. काही वेळातच पोलिसांना जमिनीखाली सुरेंद्र यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच परिसरात प्रचंड खळबळ माजली आणि घराबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली.
पत्नीची गुन्ह्याची कबुली आणि कौटुंबिक वाद
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पत्नी रुबीने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, हत्येच्या आधीच तिने बाथरुमच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि मजुरांची व्यवस्था करून ठेवली होती. पतीची हत्या केल्यानंतर तिने मृतदेह बाथरुममध्ये पुरला, त्यावर माती टाकली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी वरून सिमेंटचे प्लास्टर करून नवीन फरशा बसवून घेतल्या.
सुरेंद्र यांचे भाऊ अनिल शर्मा यांनी सांगितले की, सुरेंद्र यांना दारूचे व्यसन होते, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण होत असे. याच वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस तपास सुरू
हरिपर्वतचे एसीपी हेमंत पटेल यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. या हत्येमागे नेमका काय हेतू होता आणि यामध्ये रुबीला आणखी कोणी मदत केली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
