ऑगस्ट वेस्टलॅंडकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटात लाचखोरी झाली असल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी बुधवारी स्पष्ट केले. यासंबधीच्या तपासाचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, असा आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकदा आमच्याकडे प्राथमिक तपास अहवाल आल्यानंतर दोषींची गय केली जाणार नाही, असेही ऍंटनी म्हणाले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टरच्या मागणीचे कंत्राट इटलीच्या कंपनीलाच मिळावे, म्हणून एकूण तीन हजार ५४६ कोटी रुपयांच्या कंत्राटात फिनमेकानिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोजफ ओर्सी यांनी ३६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. इटलीतील बस्टो अर्सिझिओ शहरातील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण ६४ पानी अहवालामध्ये या प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे कंत्राट पूर्णत्वास जावे, म्हणून माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना मध्यस्थांमार्फत लाच देण्यात आली होती. त्यांना दिलेल्या लाचेची रक्कम नेमकी किती होती, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे इटलीतील अहवालात म्हटले आहे.