संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती
वादग्रस्त ठरलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराबाबतची वस्तुस्थिती आणि सविस्तर घटनाक्रम आपण ४ मे रोजी संसदेसमोर मांडू, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी सांगितले.
या हेलिकॉप्टर खरेदीबाबतच्या सविस्तर घटनाक्रमासह वस्तुस्थिती मी बुधवारी संसदेत मांडेन. खरेदी करारातील काही आवश्यक कलमे व तरतुदी या कंपनीच्या फायद्यासाठी कशा व केव्हा शिथिल करण्यात आल्या याची माहिती मी देईन, असे पर्रिकर यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले. ज्यांना या व्यवहारात लाच मिळाली, त्यांच्यावर खटला भरण्यासाठी हे लोक पुरावा मागे ठेवणार नाहीत. मात्र लाच घेण्यात आली हे आम्हाला सिद्ध करावे लागेल असे ते म्हणाले. आता काय ते आम्हालाच साबित करायचे आहे. हा मुद्दा संसदेत मांडला जाणार असल्यामुळे त्याबाबत मी प्रसारमाध्यमांशी विस्ताराने बोलणार नाही, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. २०१४ सालापर्यंत या कंपनीविरुद्ध काहीच कारवाई का करण्यात आली नाही? तत्कालीन यूपीए सरकारने या कंपनीला काळ्या यादीत का टाकले नाही, असे प्रश्न पर्रिकर यांनी विचारले. यूपीए सरकारने कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने त्याबाबतचा आदेश दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले.