ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱयांनी बुधवारी माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांची आणि त्यांच्या नातलगांची चौकशी केली. 
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचे इटलीमधील तपासातून पुढे आले होते. माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांनाही लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआय या प्रकरणाचा सध्या तपास करीत आहे.
एस. पी. त्यागी, जुली आणि डॉक्सा त्यागी यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. हेलिकॉप्टर खरेदीमध्ये मध्यस्थी करणाऱया कार्लो गेरोसा आणि गुडो हॅश्के यांनी या दोघांची नावे इटलीतील तपास पथकाला दिली होती. त्यामुळे या दोघांशी जुली आणि डॉक्सा यांचा काय संबंध आहे, याबद्दल सीबीआयच्या अधिकारयांनी विचारणा केल्याची माहिती आहे.
सीबीआयने याआधीच इंडियन आर्म्स ऑफ एरोमॅट्रिक्स आणि आयडीएस इन्फोटेक या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱयांची चौकशी केली आहे. या दोन्ही कंपन्यांचा नावाने अभियांत्रिकी कंत्राटांच्या साह्याने लाचखोरीची रक्कम मॉरिशस आणि ट्युनिशियातून भारतात आल्याची तपासात आढळले होते.