ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीतील कथित लाचखोरीप्रकरणी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱयांनी वकील गौतम खैतान यांची चौकशी केली. खैतान हे एरोमॅट्रिक्स कंपनीचे माजी संचालक आहेत. एरोमॅट्रिक्स कंपनीला दिलेल्या अभियांत्रिकी कंत्राटांच्या माध्यमातून लाचखोरीच रक्कम भारतात आल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासात स्पष्ट झाले होते.
खैतान हे सीबीआयच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर अधिकाऱयांनी त्यांची चौकशी केली, असे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने याप्रकरणात आतापर्यंत माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी, त्याचे नातेवाईक जुली आणि डोक्सा त्यागी, आयडीएस इन्फोटेकचे अधिकारी यांची चौकशी केली आहे.