गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेससमोर राजकीयदृष्ट्या अनेक पेचप्रसंग आले आहेत. या काळात काही महत्त्वाच्या तरुण नेतेमंडळींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पंजाब काँग्रेसमध्ये निवडणुकांआधी घडलेल्या महानाट्यामुळे पंजाबमधली सत्ता पक्षाला गमवावी लागली आहे. त्यात आता पक्षांतर्गत ज्येष्ठांच्या जी-२३ गटानं देखील नेतृत्वाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात देशभरात होणाऱ्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं, यावर पक्षात विचारमंथन होत असतानाचा पक्षाला अजून एक मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिवंगत नेते अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जायचे. ते सोनिया गांधींची सल्लागार आणि विश्वासातील व्यक्ती होते. २०२०मध्ये त्यांचं निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं. मात्र, आता त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सूतोवाच दिले आहेत. या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फैजल पटेल यांनी पक्षनेतृत्वावर टीका करत बाहेरचा रस्ता धरला, तर तो पक्षासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

फैजल पटेल यांनी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या ट्वीटमधील मजकुरामुळे आता ते काँग्रेस सोडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

फैजल पटेल यांनी ट्वीटमध्ये पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. “मी आता वाट बघून बघून थकलो आहे. पक्षनेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन मिळत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व पर्याय खुले ठेवत आहे”, असं ट्वीट फैजल पटेल यांनी केलं आहे.

फैजल पटेल आपमध्ये जाणार?

दरम्यान, काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर फैजल पटेल आम आदमी पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ही चर्चा तशी गेल्या वर्षीपासूनच सुरू झाली आहे. त्यांनी एप्रिल २०२१मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताना “बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली”, असं देखील ते म्हणाले होते.