पीटीआय, अहमदाबाद – अहमदाबादमधील २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेच्या ३८ जणांच्या फाशीचा आणि इतर ११ जणांच्या जन्मठेपेचा विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या दहशतवादी हल्ल्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता.
न्या. ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची सर्व अपिले फेटाळून लावली आणि या प्रकरणात ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या सदस्यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच बॉम्बस्फोटात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले.
विशेष न्यायालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये ३८ जणांना फाशी आणि ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोणत्याही न्यायालयाने एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ होती. शिक्षा झालेल्यांमध्ये ‘स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेचा माजी नेता सफदार नागोरी आणि त्याच्या सहकार्यांचा समावेश आहे.
प्रकरण काय?
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरातील विविध ठिकाणी ७० मिनिटांच्या कालावधीत २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात ५६ जणांचा मृत्यू तर २००हून अधिक जण जखमी झाले होते. स्फोटामधील जखमींना उपचारांसाठी नेण्यात येणार्या रुग्णालयातही हे स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयात ७८ जणांवर खटला चालवण्यात आला आणि त्यापैकी ४९ जणांना फेब्रुवारी २०२२ मध्ये दोषी ठरवण्यात आले. अहमदाबादमध्ये दाखल झालेले २० एफआयआर आणि बॉम्ब पेरूनही न फुटल्याने सूरत शहरात दाखल झालेले १५ एफआयआर अशा ३५ वेगवेगळ्या प्रकरणांचे एकत्रीकरण करून हा खटला चालवण्यात आला.
‘दोषींच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करा’
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पीडितांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. परंतु दोषींच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, त्यानंतरच पूर्ण न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘पोलीस, प्रशासन आणि तपास यंत्रणांनी उत्कृष्ट काम केले. न्याय विनाविलंब मिळणे अपेक्षित होते. आजच्या निकालामुळे आम्ही समाधानी आहोत आणि आता केवळ शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होण्याची आशा करतो,’ असे या हल्ल्यात भाऊ गमावलेल्या अल्पेशकुमार शहा याने ‘पीटीआय’ला सांगितले.
