Ahmedabad Air India Plane Crash : अहमदनगर येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरूवारी उड्डाण केल्याच्या काही मिनिटांमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेतील सर्वच २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. ज्यापैकी दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते.
दरम्यान या दुर्घटनेनंतर विमान कोसळताच मेघानी नगर परिसरात धुराचे मोठे लोट दिसून आले. स्थानिक आणि शासकिय यंत्रणांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. हा अपघात घडल्यानंतर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या भीषण अपघातानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या विमान अपघातानंतर विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान विमानांची देखभाल कशी केली जाते आणि विमानाच्या नियमित कोणत्या तपासण्या केल्या जातात, या तपासण्यांचे नेमके स्वरूप काय असते? त्या किती काळानंतर केल्या जातात, याचा आढावा आपण घेणार आहोत.
ए- चेक : पहिल्या टप्पा सर्वात प्राथमिक आणि सतत केल्या जाणाऱ्या विमानाच्या देखभाल तपासण्यांचा असतो. अशा प्रकारच्या तपासणी ही प्रत्येक ४०० ते ६०० फ्लाइट तास किंवा २०० ते ३०० फ्लाइट्सनंतर केली जाते. यामध्ये सखोल तपासणी, फ्लुइड लेव्हल तपासणी, फिल्टर बदलणे आणि किरकोळ सिस्टीम तपासण्या केल्या जातात.
बी – चेक : ही एक सर्वसमावेशक व्यापक स्वरूपात केली जाणारी विमान देखभाल तपासणी असते आणि ही प्रत्येक सहा ते आठ महिन्यांमध्ये केली जाते. यासाठी एक ते तीन दिवस लागतात आणि ही तपासणी साधारणपणे एअरपोर्ट हँगर येथे केली जाते.
सी – चेक : ही देखील एक व्यापक स्वरुपाची विमान देखभाल तपासणी असते, जी दर १८ ते २४ महिन्यांनी किंवा काही ठराविक फ्लाइट तासांनंतर केली जाते. ही तपासणी कधी करायची याचा निर्णय विमानाचा प्रकार काय आहे यावरून घेतला जातो.
डी- चेक : विमानाच्या देखभालीचा चौथा टप्पा हा सर्वात व्यापक असतो, म्हणून याला ‘हेवी मेंटेनन्स व्हिजिट'(एचएमव्ही) असेही म्हणतात. यामध्ये विमानाची सखोल तपासणी, दुरूस्ती आणि संपूर्ण विमानात बदल केले जातात. ज्यामध्ये स्ट्रक्चरल भाग, इंजिन आणि सिस्टम्सचा देखील समावेश असतो. अशा प्रकारची तपासणी विमानाचा प्रकार आणि वापर पाहून ही प्रत्येक सहा ते १० वर्षात केली जाते आणि यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.