Ahmedabad Air India plane crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एक एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या भीषन दुर्घटनेनंतर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये अनेक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आणले जात आहेत. यापैकी कित्येक ओळख पटवण्याच्या स्थितीत नसल्याची बाब समोर आली आहे.

रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. प्रांजल मोदी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली की, अपघातात बचावलेले आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितांना देखील गंभीर भाजल्याच्या जखमा दिसून आल्या. मात्र हे बचावलेले लोक विमानातील आहेत की विमान कोसळले त्या ठिकाणचे आहेत याबद्दल स्पष्टता मिळालेली नाही.

“बहुतांश रुग्णांना (विमान अपघातातील पीडित) गंभीर इजा झाली आहे… ते ओळख पटवण्याच्या स्थितीत नाहीत, चेहरे जळाले आहेत, त्यांची त्वचा देखील बऱ्यापैकी जळाली आहे… ते बेशुद्ध आहेत. त्यांना जिवंत राहण्यासाठी मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे,” असे डॉक्टर मोदी म्हणाले.

पीडितांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याबद्दल ते म्हणाले की, “अनेक रुग्णांनी अजूनही सीटबेल्ट लावलेले होते, ओळख पटवण्यासाठी त्यांचे खिसे कसे तपासावे.”

गुजरातच्या आनंद आणि इतरही अनेक जिल्ह्यातून त्यांच्या नातेवाईकांना विमानतळावर सोडण्यासाठी आलेले नातेवाईक आणि कुटुंबिय या दुर्घटनेनंतर रुग्णालयामध्ये त्यांच्या प्रियजनांबद्दल काही माहिती मिळेल का याची वाट पाहाताना पाहायला मिळाले. यामध्ये अहमदाबाद येथील उद्योजक तृप्ती सोनी यांचाही समावेश होता, ज्यांचा भाऊ स्वप्नील सोनी, त्यांची पत्नी योगा आणि वहिनी अल्पा सोनी हे देखील विमानात होते.

“मी इथे रुग्णालयात वाट पाहत आहे आणि अद्याप त्यांच्याबद्दल कसलीच माहिती मिळालेली नाही,” तृप्ती यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलातना सांगितले. अहमदाबाद सिव्हील रुग्णालयात त्या त्यांच्या नातेवाईकांबद्दल माहिती मिळेल याची वाट पाहत होत्या. त्यांचे कुटुंबिय हे लंडनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी जात होते आणि त्यानंतर ते सुट्टीवर जाणार होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान दुर्घटनेशी संबंधित माहितीसाठी गुजरात सरकारने ०७९-२३२-५१९०० आणि ९९७८४०५३०४ हे हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत.