Ahmedabad Air India Plane Crash BJ Medical College Doctors Press Conference : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज (१२ जून) दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. हे विमान रहिवासी परिसरात कोसळल्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ व बीएसएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, प्रशासनाने आतापर्यंत या दुर्घटनेचं कारण सांगितलेलं नाही. तसेच या दुर्घटनेत आतापर्यंत किती जीवित व वित्तहानी झाली आहे याची अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
दरम्यान, गुजरातच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत करून आरोग्य विभाग व रुग्णालय प्रशासनाकडील माहिती शेअर केली.
५० रहिवासी जखमी
द्विवेदी म्हणाले, “हे विमान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल, स्टाफ क्वार्टर्स व इतर निवासी भागात कोसळलं आहे. यामुळे विमानातील प्रवाशांसह रहिवासी भागात मोठी हानी झाली आहे. ५० हून अधिक जखमी रहिवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात आणलं आहे. यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर आहे”.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणाले, “विमानातील प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी डीएनए तपासणी करण्यासाठी सहकार्य करावं. आम्ही त्यांच्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कसोटी भवन येथे व्यवस्था केली आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्यांचे आई-वडील, मुलगा-मुलगी व इतर जवळच्या नातेवाईकांनी डीएनए तपासणीसाठी त्यांचे नमुने द्यावेत. जेणेकरून दुर्घटनेतील व्यक्तींची ओळख पटवता येईल. यासह आम्ही प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी दोन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत”.
नेमकी घटना काय?
अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय-१७१ उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व प्रवाशांच्या नातेवाईकांना एअर इंडियाकडून सहकार्य केलं जात आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करत आहे. तसेच या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरील प्रोफाइल फोटो हटवला आहे.