Ahmedabad Air India Plane Crash Sanjay Raut’s Remark : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. यावरून शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात ड्रीमलायनर विमान कोसळलं. ज्यामध्ये २४२ प्रवासी होते. केवळ ३० सेकंदात विमान कोसळलं याचा अर्थ त्यात काहीतरी गडबड असेल. तरीदेखील त्या विमानाला लंडनसाठी उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? या सगळ्याची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. मात्र, सरकार या दुर्घटनेची जबाबदारी नाकारू शकत नाही.

संजय राऊत म्हणाले, “तपासण्या करून तंत्रज्ञांनी विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी दिल्यानंतर विमानाने उड्डाण केलं, त्यानंतर ३० सेकंदात विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली, हे कसं काय घडलं? नेमकी काय गडबड झाली? याची चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून काहीतरी निष्पन्न होईल, कदाचित सत्य समोर येईल. मात्र या २६५ मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार? विमानातील २४२ जण, जिथे विमान कोसळलं तिथले डॉक्टर, विद्यार्थी असे मिळून २६५ जण दगावले आहेत. त्यांच्या मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार आहे?”

“तुम्हाला दहशतवादी हल्ला, अपघात टाळता येत नाहीत, मग सत्तेत कशाला बसलाय?”

शिवसेनेचे राज्यसभा खासदार म्हणाले, “काल दुर्घटनेनंतर अमित शाहांनी घटनास्थळी भेट दिली आणि म्हणाले की ‘हा अपघात होता, अपघात टाळता येत नाहीत’. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला अपघात टाळता येत नाहीत, तुम्हाला पहलगाममधील दहशतवादी हल्ला टाळता येत नाही. मग तुम्ही सत्तेत कशाला बसलाय? तुमच्या राज्यात (सरकार) कोणीच सुरक्षित नाही. रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, विमान प्रवासी सुरक्षित नाहीत. पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या राज्यात नेमकं कोण सुरक्षित आहे? या प्रश्नांचं अमित शाहांनी उत्तर द्यावं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही कसलं राज्य चालवताय? राऊतांचा मोदींना प्रश्न

या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, “सगळेच जण जबाबदारी झटकत आहेत. कोणाला तरी या घटनेची जबाबदारी घ्यावी लागेल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी अथवा पंतप्रधानांनी या दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी. मुंबईत व देशात कित्येक रेल्वे अपघात झाल्यानंतरही रेल्वेमंत्री त्याची जबाबदारी घेत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशांतर्गत हल्ल्याची जबाबदारी घेत नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर ही मोहीम बंद करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या अपयशाची जबाबदारी घेत नाहीत. मग तुम्ही भाजपावाले कसलं राज्य चालवताय?”