सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांना अश्लील फोटो, व्हिडीओ आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ एफआयआर दाखल केल्या आहेत. आरोपींना गुजरातमधील विविध जिल्ह्यांसह राजस्थानमधून शोधून काढण्यात आले. सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन बुलिंग, अश्लील कंटेंट पाठवणे आणि महिलांना मानसिक त्रास देणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

‘मिशन सायबर रक्षिका’अंतर्गत कारवाई

महिलांना ऑनलाइन छळापासून संरक्षण देण्यासाठी अहमदाबाद शहर पोलिसांनी जून २०२६ मध्ये ‘मिशन सायबर रक्षिका – #SecureHerSpace’ ही मोहीम सुरू केली. महिलांनी केलेल्या तक्रारींची महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून गोपनीय पद्धतीने दखल घेण्यात आली. तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवून एफआयआर दाखल करण्यात आले. त्यानंतर बनावट सोशल मीडिया अकाउंटची माहिती मिळवून तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला.

एका आरोपीने ३०० महिलांशी संपर्क केल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश पुरी याने मागील सहा महिन्यांत तब्बल १० बनावट सोशल मीडिया आयडी तयार केले. या अकाउंटच्या माध्यमातून त्याने सुमारे ३०० महिलांशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. तो महिलांना अश्लील फोटो, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलांच्या नावाने बनावट अकाउंट

दुसरा आरोपी केयूर लक्कड याने महिलांच्या नावाने ८ बनावट अकाउंट तयार केल्याचा आरोप आहे. या अकाउंटच्या माध्यमातून तो सार्वजनिक प्रोफाइल असलेल्या महिलांच्या महिला मित्रांशी संपर्क साधत असल्याचे तपासात समोर आले. काही प्रकरणांमध्ये आरोपींनी पीडित महिलांच्या नातेवाईकांशी आणि परिचितांशीही बनावट ओळख वापरून संपर्क साधल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांची सामाजिक बदनामी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचा संशय आहे. काही प्रकरणांत पैसे उकळण्याचाही प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

एआयच्या मदतीने अश्लील फोटो तयार केल्याचा प्रकार

सायबर पोलिसांनी यापूर्वीही अशाच प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. राजस्थानमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी सोशल मीडियावर स्वतःला ‘लव्ह गुरु’ म्हणून सादर करून महिलांना लक्ष्य करत असल्याचा आरोप आहे. दिल्लीतील एका आरोपीने योगगुरू असल्याचे भासवून बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. त्याने महिलांचे वैयक्तिक फोटो मिळवून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला.

महिलांसाठी स्वतंत्र १० सदस्यीय पथक

अहमदाबाद पोलिसांनी आता महिलांशी संबंधित सायबर तक्रारींसाठी १० सदस्यीय सायबर रक्षक पथक तयार केले आहे. या पथकात एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि ८ महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, महिलांना सायबर स्पेसमध्ये येणाऱ्या अडचणी मोकळेपणाने सांगता याव्यात आणि त्यांच्यावर कारवाई करता यावी, यासाठी हे विशेष व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांना पोलिसांचा इशारा

पोलिसांच्या तपासात काही आरोपींनी सार्वजनिक आणि असुरक्षित सोशल मीडिया प्रोफाइलचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. अधिक फॉलोअर्स किंवा लाइक्स मिळवण्याच्या नादात अनोळखी अकाउंटशी संपर्क साधणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

महिलांसह सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शक्य असल्यास अकाउंट प्रायव्हेट ठेवावे, मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरावेत आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावे, असे पोलिसांनी सांगितले. सेच अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड किंवा फॉलो रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. फोन नंबर, घराचा पत्ता, रोजची दिनचर्या किंवा लाइव्ह लोकेशन यांसारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे शेअर करणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सायबर छळाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी १९३० सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा अहमदाबाद सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.