अहमदाबाद येथील चांदखेडा भागात ४ एप्रिलला घडलेली घटना आता संपूर्ण शहरात आणि देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता दहा दिवसांनी अशी माहिती समोर आणली आहे जी कुणालाही चक्रावून टाकेल. डोसा खाल्ल्याने दोन मुलींचा मृत्यू झाल्याची ही घटना होती. आता पोलिसांचं म्हणणं आहे की ही घटना म्हणजे घातपात आणि ठरवून केलेल्या हत्या असू शकतात. तसंच एक डायरीही समोर आली आहे. ज्यामुळे संशयाची सुई आई वडिलांच्या दिशेने वळली आहे. डोसा मृत्यूंचं हे प्रकरण काय आपण जाणून घेऊ.
डोसा मृत्यूंचं प्रकरण नेमकं काय आहे?
अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी जे. के. मकवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रजापती कुटुंबातील दोन मुली राहा आणि मिष्टी यांच्या मृत्यूनंतर आता त्यांची आई भावना आणि वडील विमलभाई यांची चौकशी सुरु आहे. भावना आणि विमलभाई या दोघांनी सुरुवातीपासूनच एक बाब स्पष्ट केली आहे की घराशेजारी असलेल्या डेअरीतून डोसा पीठ आणलं त्याचा डोसा खाल्ल्याने आमच्या मुलींचा मृत्यू झाला.
डायरीमुळे आई वडिलांवर संशय?
जे.के. मकवाना यांनी सांगितलं की आम्हाला तपासादरम्यान भावना यांची डायरी सापडली. त्यात मुलगा झाला की आम्ही नवस फेडायला येऊ असं लिहिलं होतं. १३ एप्रिलला भावना प्रजापती यांची आम्ही दुपारी ३ ते रात्री २ वाजेपर्यंत कसून चौकशी केली तेव्हा भावना यांनी सांगितलं की आम्हाला पहिली मुलगी झाली, त्यानंतर मुलगा व्हावा असं आम्हाला वाटत होतं. एक मुलगा झाला की आपलं चौकोनी कुटुंब होईल असं मला आणि विमल यांना वाटत होतं.
भावना आणि विमलभाई यांच्या रक्ताच्या अहवालात काय आढळलं?
भावना आणि विमलभाई यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात जस्त आणि अॅल्युमिनियम फॉस्फाइडचे नमुने आढळून आले. घराची झडती घेण्यात आली त्यात गहू दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी कीटकनाशक म्हणून वापरण्यात येणारं औषध आणि गोळ्याही सापडल्या. पोलिसांनी जेव्हा मुलींच्या वडिलांना याबाबत विचारणा केली तेव्हा या गोळ्या आम्ही आणल्या होत्या असं त्याने सांगितलं. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
डोसा मर्डरचा घटनाक्रम कसा होता?
१ एप्रिलला विमलभाई प्रजापती यांनी चांदखेडा येथील त्यांच्या घराजवळच्या घनश्याम डेअरीतून डोशाचं तीन किलो पीठ आणलं.
१ तारखेच्या संध्याकाळी आणि २ तारखेच्या संध्याकाळी या पीठाचे डोसे प्रजापती कुटुंबाने खाल्ले.
३ एप्रिलच्या सकाळी विमलभाई आणि त्याची पत्नी भावना यांना त्रास होऊ लागला. तसंच त्यांच्या मुली मिष्टि आणि राहा यांनाही त्रास होऊ लागला.
३ तारखेला दुपारपर्यंत हा त्रास कमी झाला त्यामुळे विमलभाई आणि भावना दोघंही हॉस्पिटल किंवा दवाखान्यात गेले नाहीत, मुलींनाही नेलं नाही.
मुलींना होणारा त्रास वाढला, तीन महिन्यांच्या राहाची प्रकृती खालावली. तिचा घरातच मृत्यू झाला. त्यानंतर ५ एप्रिलला मिष्टी, विमलभाई आणि भावना या तिघांना के.डी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यात उपचारांदरम्यान मिष्टीचाही मृत्यू झाला.
दोन दिवसांत दोन मृत्यू झाल्याने पोलिसांनी या प्रकणात लक्ष घातलं. अपघाती मृत्यूची नोंद केली. घनश्याम डेअरीतून डोशाचं पीठ आणलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने डेअरी गाठली.
डेअरीच्या मालकाने सगळे आरोप फेटाळले
डोसा पीठ विकणाऱ्या डेअरी मालकाने सगळे आरोप फेटाळले, तो म्हणाला आमच्या डेअरीत रोज येणाऱ्या किमान २० ग्राहकांनी डोसा पीठ नेलं होतं. पण आजारी पडल्याची तक्रार एकानेही केली नाही. त्या दिवशी १०० ते १२५ किलो पीठ विकलं.
पोलिसांनी नंतर मिष्टीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. तसंच डेअरीमधले नमुने आणि प्रजापती यांच्या घरातले काही आवश्यक नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अद्याप अहवाल आलेला नाही. पण जे तपासात समोर आलंय त्यातून हे डोसा पीठामुळे झालेले मृत्यू नाहीत असं पोलिसांना वाटतं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. घनश्याम डेअरीमध्ये जे लोक आले होते त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. कुणालाही डोसा पीठामुळे त्रास झाल्याचं समोर आलं नाही. शिवाय काही आरोग्य तज्ज्ञांशी पोलिसांनी संपर्क साधला. आईने डोसा खाल्ला आणि तिचं दूध तीन महिन्यांच्या राहाने प्यायलं म्हणून तिला विषबाधा होईलच असं नाही असं सांगितलं.

राहाच्या मृतदेहावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार
राहाचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्याच दिवशी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन तो दफन करण्यात आला. याबाबत प्रजापती कुटुंबाला विचारणा केली असता आम्ही त्या दिवशी दुःखात होतो काय करायचं ते सुचलं नाही त्यामुळे अंत्यसंस्कार केले असं त्यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी हा मृतदेह दफनविधी झालेला असूनही बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शिवाय अॅलिम्युनिम फॉस्फेटचे नमुने आढळले, जी डायरी मिळाली त्यात या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच राहाच्या जन्माच्या आधी नवस केला होता. मुलगी झाल्यानंतर हे सगळं घडलं का? याची माहिती आता पोलीस घेत आहेत. डोसा खाल्ल्याने विषबाधा होऊन हे मृत्यू झालेत ही शक्यता आता पोलिसांनी सध्या बाजूला ठेवली आहे. आता डोसा मृत्यू प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
