गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेत १० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अहमदाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे.
अहमदाबादमधील रामोल-गतराड रोडवरील महमूदपुरा भागात असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. हा कारखाना महमूदपुरा परिसरात एका मोकळ्या जागेत सुरू होता. या कारखान्यात अचानक स्फोट झाला आणि यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या घटनेनंतर जखमी कामगारांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सहपोलीस आयुक्त जयपाल सिंह राठोड यांनी सांगितलं की, “एका मोकळ्या जागेत फटाके बनवण्याचं काम सुरू होतं. या ठिकाणी १२ ते १५ लोक काम करत होते. या कारखान्याचा परवाना याआधीच रद्द करण्यात आला होता. मात्र, तरीही हा कारखाना सुरु होता.”
परिस्थिती नियंत्रणात असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. तसेच पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरू आहे. स्फोटाचं कारण शोधण्यासाठी आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं आहे का? याची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि इतर तपास यंत्रणांच्या पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलेलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींकडून मृतांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “गुजरातच्या अहमदाबादमधील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावल्याच्या घटनेने दुःख झालं. दुःखाच्या या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची, तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.
