Ahmedabad Rape News Apartment : अहमदाबादमधील एका इमारतीच्या गच्चीवर शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री एका सुरक्षा रक्षकाने २३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गळ्याभोवती तार गुंडाळून बेशुद्ध केलं
अहमदाबादमधील आनंदनगर भागातील एका पाच मजली इमारतीमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणी इतर तीन महिलांसोबत या सोसायटीत भाड्याने राहत होती. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ती जेवण झाल्यानंतर इमारतीच्या गच्चीवर शतपावली करत असताना तिच्याबरोबर हा अपप्रकार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त (सेक्टर १) नीरज बडगुजर यांनी सांगितलं की, धरम सिंग असं ओळख पटलेल्या आरोपीने पीडित तरुणीवर मागून दबा धरून हल्ला केला. त्याने तिच्या गळ्याभोवती तार गुंडाळली. त्यामुळे तिचा श्वास कोंडला आणि ती खाली कोसळली.
“गळा आवळल्यामुळे ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला”, असं बडगुजर यांनी स्पष्ट केलं. गुन्ह्यानंतर आरोपीने गच्चीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तिथून पळ काढला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे इमारतीतील लोक जमा झाले. बडगुजर म्हणाले, “तरुणीने मदतीसाठी आवाज दिल्यानंतर पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी गच्चीचा दरवाजा उघडला. पोलिसांनी या घटनेवर त्वरित कारवाई करत गुन्हा दाखल केला.”
ते पुढे म्हणाले, “आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील १० पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि अखेर थलतेजमधील हेबतपूरजवळ आरोपीला शोधून काढले. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.”
पोलीस सूत्रांनुसार, पीडित तरुणी डिझाइन शाखेत उच्च शिक्षण घेत आहे. तर आरोपी अवघ्या चार दिवसांपूर्वीच या सोसायटीत कामाला आला होता. यापूर्वी तो शहरातील दुसऱ्या एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये काम करत होता.
