Ahmedabad Food Poisoning Case: गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कुटुंबात धक्कादायक प्रसंग घडला आहे. दुकानातून तयार आंबवलेले पीठ आणल्यानंतर घरी त्याचा डोसा बनवून खाल्ला आणि यानंतर दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. तसेच मुलींच्या आई-वडिलांचीही प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मृत मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनी या घटनेची माहिती दिली. सदर घटना १ एप्रिलपासून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या मुलाने (विमल) जवळच असलेल्या घनश्याम डेअरीमधून ‘खिरू’ (आंबवलेले पीठ) आणले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाची पत्नी भावना आणि दोन्ही मुलींनी उलट्या करण्यास सुरुवात केली. त्यांची प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

३ एप्रिल रोजी तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर ५ एप्रिल रोजी चार वर्षांच्या मुलीचाही याच पद्धतीने मृत्यू झाला. तर विमल आणि भावना यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली.

अहमदाबाद महानगरपालिकेने घनश्याम डेअरीमधून नमुने घेतले आणि ते अन्न व सुरक्षा प्रयोगशाळेत चाचणीसाठी सादर केले. पोलिसांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्यामुळे अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

डेअरी मालकाने काय म्हटले?

ज्या डेअरीमधून आंबवलेले पीठ आणले त्या डेअरीचे मालक घनश्याम शाह म्हणाले की, आमच्या दुकानातून रोज शेकडो ग्राहक ‘खिरू’ विकत नेतात. पण आतापर्यंत आम्हाला कुणाचीही तक्रार आलेली नाही. १ एप्रिल रोजीही आम्ही जवळपास १०० किलो ‘खिरू’ विकले. पण कुणालाच काही अडचण आली नाही.

इंडिया टुडेशी बोलताना डेअरी चालक शाह यांनी सांगितले की, सदर बातमी कळल्यानंतर मीही काही ग्राहकांना फोन करून त्यांना काही समस्या उद्भवली का? याची माहिती घेतली. मात्र त्यादिवशी ‘खिरू’ विकत घेतलेल्या ग्राहकांनी कोणतीही अडचण आली नसल्याचे सांगितले.

दरम्यान अहमदाबाद मनपाने सांगितले की, विमलने त्या दिवशी तीन किलो पीठ विकत घेतले होते. मात्र डोसा बनविण्यासाठी त्यातील फक्त ३०० ग्रॅमच वापरले.

पुरलेले शव काढावे लागले

अहमदाबादच्या चांदखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे पार्थिव पुरण्यात आले होते. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालासाठी मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला गेला. दुसऱ्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण जाणून घेणे आणि याप्रकरणाची उकल करणे, पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे.