अहमदाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूचा तपास सुरुवातीला ‘हिट अँड रन’ प्रकरण म्हणून सुरू होता. मात्र, तपासादरम्यान हा अपघात नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाची दिशा बदलली आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तरुणीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तिच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
१२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता ही घटना घडल्याचे सुरुवातीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तरुणीचा ३८ वर्षीय भाऊ दुचाकी चालवत होता आणि ती मागे बसली होती. दोघेही गुजरातमधील सरखेज परिसरातील घरी जात असताना मागून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचा दावा भावाने केला होता.
गंभीर जखमी तरुणीचा रुग्णालयात मृत्यू
या कथित अपघातात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी जीएमईआरएस सोला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १३ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर अहमदाबाद वाहतूक पोलिसांच्या एम विभागाने अपघाताचा तपास सुरू केला. मात्र, घटनास्थळाची आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांना सुरुवातीच्या तक्रारीतील घटनाक्रमाबाबत संशय निर्माण झाला.
पोलिस निरीक्षक यू. बी. ढाखडा यांनी सांगितले की, शवविच्छेदनअहवालानुसार डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मेंदूत रक्तस्राव झाला व तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघाताच्या तक्रारीतील बाबींवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे अपघात असल्याचा दावा ठरला खोटा
पोलिसांनी सांगितले की, तक्रारीत ज्या ठिकाणी अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सुरुवातीला तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आरोपींना वाटले असावे. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजमध्ये १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी सुरू केली.
वाहतूक पोलिसांच्या निवेदनानुसार, काही महिन्यांपूर्वी तरुणीचा एका तरुणासोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचा ३८ वर्षीय भाऊ आणि ५६ वर्षीय वडील यांनी तिला सुनावल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर दोघांनी मिळून तिच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. त्यांच्या गोदामातून लोखंडी हातोडा घेऊन त्यांनी तरुणीला गेल्जीपुरा गावाजवळील परिसरात नेले. तिथे भावाने तिच्या डोक्यात हातोड्याने वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्या लपवण्यासाठी अपघाताची खोटी कहाणी?
तरुणीच्या मृत्यूनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी भावाने हिट अँड रनची खोटी तक्रार दाखल केल्याचा संशय आहे. सुरुवातीला या घटनेचा अपघात म्हणून तपास केला जात होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांमुळे पोलिसांना तक्रारीतील घटनाक्रमावर संशय आला.
या प्रकरणात, मंगळवार संध्याकाळपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, सरखेज पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला हातोडा जप्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
