scorecardresearch

पोटगी देण्यास पती असमर्थ, न्यायालायने सुनावली ४८० दिवसांच्या कारावासाची शिक्षा

ठरलेली रक्कम पत्नीला का दिली नाही?, असा प्रश्न न्यायलयाने उपस्थित केला

कारावासाची शिक्षा
अहमदाबादमधील एका नामांकित औषध कंपनीमधील कर्मचाऱ्याने घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीला पोटगीची रक्कम न दिल्याने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. घटस्फोटानंतर पत्नीला पोटगी म्हणून एक लाख २० हजार रुपये देण्यास या व्यक्तीने नकार दिल्याने त्याला ४८० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मिर्झापूरमधील ग्रामीण न्यायलयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी थालतेज येथील एका दांपत्याच्या घटस्फोटासंदर्भातील सुनावणीचा निकाल दिला. यामध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी नरेश राजने या २९ वर्षीय व्यक्तीला ४८० दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नरेश आणि त्याच्या पत्नीचा २०१८ साली घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या वेळी नरेशने दर महिन्याला पत्नीला साडेसात हजार रुपये पोटगीची रक्कम देण्यास होकार दिला होता. मात्र त्याने मागील १६ महिन्यांपासून पत्नीला पोटगीची रक्कम दिलेली नाही. या प्रकरणात पत्नीने न्यायलयात धाव घेतली. नरेशच्या पत्नीने दाखल केलेल्या प्रकरणाची दखल घेत नरेशने ठरलेली रक्कम पत्नीला का दिली नाही यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवले. यावर उत्तर देताना नरेशने आपण पोटगी देण्यास असमर्थ असल्याचे सांगितलं. “आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मी पत्नीला पोटगीचे पैसे देऊ शकलो नाही. भविष्यातही हे पैसे देता येणार नाहीत,” असं उत्तर नरेशने न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर दिले. मात्र नरेशचे हे कारण न्यायालयाला योग्य वाटले नाही. या प्रकरणात नरेशला दोषी ठरवण्यात आलं.

“आजही नरेश पोटगीची रक्कम देण्यास तयार नाही. त्यामुळे त्याला वेळ वाढवून देण्यात काहीच अर्थ नाही. कारण त्याला वेळ दिल्यास तो त्याच्या पत्नीवर अन्याय ठरेल. तसेच पोटगी देण्याची नरेशची इच्छाच नसल्याने त्याला वेळ देणे म्हणजे कायद्याचा अपमान ठरेल,” असं निरिक्षण न्यायलयाने नोंदवलं. त्यानंतर १६ महिन्यांचे पैसे न दिल्याने नरेशला १६ महिन्यांची म्हणजेच ४८० दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा न्यायलयाने सुनावली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ahmedabad man gets 480 days in jail for not paying maintenance amount to wife scsg

ताज्या बातम्या