Cyber Crime Ahmedabad Sextortion Scam: व्हिडीओ कॉल सुरू होताच समोर दिसलेली नग्न तरुणी, त्यानंतर तयार केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि थेट दिल्ली सायबर पोलिसांच्या नावाने अटकेची भीती… या सर्व चक्रव्यूहात अडकवून सायबर भामट्यांनी अहमदाबादमधील एका २५ वर्षीय तरुणाला तब्बल ४९.७८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या या तरुणाला ३ सप्टेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला होता. तरुणाने हा कॉल स्वीकारताच स्क्रीनवर एक नग्न तरुणी दिसली. हा प्रकार पाहून घाबरलेल्या तरुणाने तत्काळ कॉल कट करून तो क्रमांक ब्लॉक केला. मात्र, काही वेळातच दुसऱ्या क्रमांकावरून त्याला पुन्हा कॉल आला. “तुझा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला असून पैसे न दिल्यास तो सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल,” अशी धमकी समोरील व्यक्तीने दिली.
तक्रारदाराने तो कॉलही बंद करून नंबर ब्लॉक केला. यादरम्यान त्याला पाठवण्यात आलेला कथित व्हिडीओही त्याने घाबरून डिलीट केला.
दिल्ली सायबर सेलचा बनावट अधिकारी बनून फोन
या घटनेनंतर काही दिवसांनी, म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी सायबर भामट्यांनी पुन्हा एका अनोळखी क्रमांकावरून या तरुणाशी संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख ‘दिल्ली सायबर गुन्हे शाखेचा अधिकारी संजय अरोरा’ अशी करून दिली. कथित नग्न व्हिडीओचा संदर्भ देत त्याने तरुणाला थेट पोलीस कारवाईची भीती दाखवली. “अशा प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असून अहमदाबाद पोलीस तुला कधीही अटक करू शकतात,” अशी धमकी या तोतया अधिकाऱ्याने दिली. तसेच अटक टाळायची असल्यास यूट्यूबच्या प्रतिनिधीशी बोलून ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे सांगत त्याला एका कथित प्रतिनिधीशी संपर्क साधण्यास भाग पाडले.
कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी देत उकळले पैसे
स्वतःला यूट्यूबचा एक्झिक्युटिव्ह सांगणाऱ्या व्यक्तीने, “तुझ्या नावाने असे दोन नग्न व्हिडीओ समोर आले असून ते हटवण्यासाठी ७१,२५० रुपये भरावे लागतील,” असे सांगितले. बदनामी आणि अटकेच्या भीतीने तरुणाने ही रक्कम पाठवली. मात्र, एकदा पैसे मिळताच सायबर चोरांची हाव वाढली. त्यांनी विविध कारणे पुढे करत आणखी पैशांची मागणी सुरू केली. व्हिडीओ व्हायरल करून कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची आणि तुरुंगात टाकण्याची वारंवार धमकी दिली जात असल्याने तरुणाने वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर तब्बल ४९.७८ लाख रुपये पाठवले.
एवढी मोठी रक्कम उकळूनही भामट्यांकडून आणखी पैशांसाठी तगादा सुरूच ठेवला. अखेर आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार नोंदवली. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आले, त्या खात्यांचा तपशील पोलिसांना मिळाला असून या टोळीमध्ये नेमके किती जण सामील आहेत, याचा शोध सायबर सेल घेत आहे.
