फक्त दरवाजा उघडण्यास उशीर झाला या किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. शहरातील वेजलपूर भागातील एका पेइंग गेस्ट (PG) हाऊसमध्ये ही घटना घडली. हिरेन सोलंकी असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत राहणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
‘द इंडियन एक्सप्रेस’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत हिरेन सोलंकी गेल्या चार वर्षांपासून अहमदाबादमध्ये काम करत होता आणि गेल्या तीन महिन्यांपासून वेजलपूर येथील सत्यनारायण सोसायटीत असलेल्या एका पीजीमध्ये राहत होता. याच पीजीमध्ये महावीरसिंह जादव आणि रणवीरसिंह सिंधव हे दोघेही राहत होते.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता,खोलीचा दरवाजा उघडण्यास उशीर झाल्यामुळे हिरेन आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, महावीरसिंह जादव याने रागाच्या भरात चाकू काढून थेट हिरेनच्या पोटात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिरेनचा प्रचंड रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या आधीही त्यांच्यात दरवाजा उघडण्याच्या कारणावरून अनेकदा भांडणे झाली होती, अशी माहिती पोलीसांनी दिली.
वडिलांना फोन आला अन्…
हिरेनचे वडील मेन्सी रुडा सोलंकी हे जुनागढ जिल्ह्यातील गाडू गावचे रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांना पीजीमधून फोन आला की, हिरेनचे भांडण झाले आहे आणि त्यांनी तातडीने अहमदाबादला पोहोचावे.
मेन्सी सोलंकी आपल्या लहान मुलासह तात्काळ अहमदाबादला पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना हिरेनचा मृत्यू झाल्याचे समजले, ज्यामुळे सोलंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन्ही आरोपींना अटक
या घटनेनंतर इतर पीजी रहिवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वेजलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत हिरेनच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महावीरसिंह जादव आणि रणवीरसिंह सिंधव यांच्याविरुद्ध हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. राग किती घातक ठरतो ह्याचे हे उदाहरण ठरले आहे. केवळ एका छोट्याशा कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात आणि पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व नोकरदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
