१२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताला एक वर्ष पूर्ण झालं. या दुर्दैवी घटनेत जीव गमावणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी एकत्र येऊन सर्वांना आदरांजली वाहिली. यावेळी तिथे आलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. या विमान अपघातात अमरेली जिल्ह्यातील पडसाला कुटुंबाची एकुलती एक मुलगी रिद्धी हिचंही निधन झालं. तिच्या आई गीता मुलीच्या आठवणीत रडल्या. या विमानाचा ब्लॅक बॉक्स जाहीर करावा, आम्हाला आर्थिक मदत नको, पण अपघात कशामुळे झालाय, ते जाणून घ्यायचंय अशी विनवणी त्यांनी सरकारला केली.

२५ वर्षांच्या रिद्धी पडसाला हिचं लग्न मूळचा राजकोट येथील आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या एका तरुणाशी झालं होतं. मे २०२५ मध्ये रिद्धी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आली होती. १२ जून २०२५ रोजी ती परत लंडनला जात होती. रिद्धीच्या शेवटच्या क्षणाबद्दल गीता पडसाला म्हणाल्या, “विमानतळावर सामान चेक करून रिद्धी आत गेली, तेव्हा तिने आम्हांला म्हटलं होतं की, ‘तुम्ही सगळे रात्रभर जागे होतात, त्यामुळे आता घरी जाऊन झोपा. मी पण विमानात झोपेन आणि लंडनला पोहोचल्यावर फोन करेन.'” परंतु मुलीचा ‘मी पोहोचले’ असा फोन येण्याऐवजी तिच्या मृत्यूची बातमी देणारा फोन आला.

डीएनए चाचणीनंतर पटलेली मृतदेहाची ओळख

रिद्धीला विमानतळावर सोडून तिचे कुटुंबीय घरी परततच होते, तितक्यात अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच विमान कोसळल्याची बातमी आली. हे ऐकताच कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की, पाच दिवसांनी, डीएनए चाचणी केल्यानंतर रिद्धीच्या मृतदेहाची ओळख पटू शकली. त्यानंतर रिद्धीचे पार्थिव अमरेली इथे आणि तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिन्यांनी जावयाने केलं दुसरं लग्न

एकुलत्या एक लेकीच्या निधनाबद्दल बोलताना गीता पडसाला यांनी एक एक धक्कादायक खुलासाही केला. “मुलीच्या मृत्यूनंतर सरकार आणि विमा कंपनीकडून मिळणारी सव्वा कोटी रुपयांची सर्व आर्थिक मदत जावयाला मिळाली. त्याने तर आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या ६ महिन्यांतच दुसरं लग्न केलं. तिच्या पैशांमधून प्री-वेडिंग फोटोशूट आणि धुमधडाक्यात लग्न केलं. आम्ही आमचं सगळं गमावलं पण आमचा जावई मात्र सहा महिन्यातच आयुष्यात पुढे निघून गेला,” असं गीता पडसाला म्हणाल्या.

अहमदाबादमधील या विमान अपघातात एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. तर विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी वाचला. त्याला या अपघाताचा एवढा मोठा धक्का बसला आहे की अजूनही तो सावरलेला नाही.