अहमदाबादमध्ये एका महिलेचा छळ करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर, घरचा पत्ता आणि फोटो वापरून अश्लील मजकूर असलेल्या चिठ्ठ्या चलनी नोटांसोबत विविध ठिकाणी टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचा महिलेचा आरोप आहे. महिलेने ओढव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १० आणि २० रुपयांच्या नोटांना हस्तलिखित चिठ्ठ्या जोडून त्या वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केल्या जात होत्या. या चिठ्ठ्यांवर तिचा मोबाईल नंबर, घरचा पत्ता आणि फोटो असल्याचे तिने सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
चिठ्ठ्यांमध्ये अश्लील मजकूर
चिठ्ठ्यांमध्ये महिलेविषयी अश्लील आणि बदनामीकारक मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या मोबाईल नंबरवर फोन करून हजार रुपयांत लैंगिक सेवा मिळवता येईल, अशा स्वरूपाचा मजकूरही लिहिल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने फोन न उचलल्यास तिच्या व्हॉट्सॲपवर फोटो पाठवण्यास सांगितल्याचा आरोपही आहे. या चिठ्ठ्या सापडलेल्या काही नागरिकांनी त्यावरील नंबरवर संपर्क साधला आणि नंतर त्या चिठ्ठ्यांचे फोटो महिलेच्या व्हॉट्सॲपवर पाठवले.
सततच्या फोनमुळे वैवाहिक आयुष्यावर परिणाम
महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येत होते. फोन करणारे लोक अश्लील मागण्या करत असल्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अखेर तिने ओढव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारदार महिलेने सांगितले की, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास व्हॉट्सॲप मेसेज तपासत असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून स्वतःचाच एक फोटो प्राप्त झाला. त्यांनी त्या मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्यांना एका चलनी नोटचा फोटो पाठवण्यात आला; ज्या नोटवर चिकटवलेल्या कागदावर त्यांचे व त्यांच्या पतीचे मोबाईल क्रमांक, त्यांचा पत्ता आणि अश्लील मजकूर लिहिलेला होता. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीने त्या व्यक्तीशी संवाद साधला, तेव्हा त्याला ही नोट ओढव एस.पी. रिंग रोडवरील जानवी आर्केड परिसरातील पार्किंगजवळ एका चिठ्ठीसह सापडल्याचे सांगितले.
तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
पोलिसांनी जानवी आर्केड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात ४ सप्टेंबर रोजी एक व्यक्ती ॲक्टिव्हा स्कूटरवरून येऊन पार्किंग परिसरात चिठ्ठी टाकताना पोलिसांनी दिसले. संशयित व्यक्ती कोणत्या मार्गाने गेली, याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी त्या मार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. नारोडा, रामोल टोल प्लाझा, हाटकेश्वर सर्कल, सिंगरवा गाव आणि ओढव रिंग रोडसह विविध भागांतील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यातून पोलिसांना संशयितापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
३६ वर्षीय व्यक्तीला अटक
तपासानंतर पोलिसांनी ३६ वर्षीय रवींद्र प्रभुलाल भुरालाल पांचाळ याला अटक केली. तो अहमदाबादमधील ओढव परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने पोलिसांनी दाखवलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती आपला दूरचा नातेवाईक असल्याचे ओळखल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात भारतीय न्याय संहित्याच्या कलम ७९ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आरोपीला अटक करण्यात आली असून चिठ्ठ्या कोणत्या उद्देशाने आणि किती ठिकाणी टाकण्यात आल्या, तसेच या छळामागील नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास सुरू आहे.
