AI in Indian Army Future Warfare: “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सैनिकांची जागा कधीही घेणार नाही; मात्र सैनिकांची युद्ध लढण्याची पद्धत आणि त्यांची कार्यक्षमता यामध्ये ती मूलभूत बदल घडवून आणेल”, असे विधान लष्करा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पुनीत आहुजा यांनी केले. भविष्यातील संघर्षांमध्ये भारताला गाफील राहणे परवडणारे नाही, असा इशारा देत लेफ्टनंट जनरल आहुजा यांनी उद्याच्या युद्धांसाठी भारतीय सैन्यात आमुलाग्र स्थित्यंतर घडवून आणण्याच्या गरजेवर भर दिला. ‘न्यूज १८’च्या ‘डेफकॉन २०२६’ या संरक्षण परिषदेत ते बोलत होते.
या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “लष्करात घडवून आणू इच्छित असलेल्या महत्त्वाच्या बदलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर हा केंद्रस्थानी आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेणे, पाळत ठेवणे, शत्रूच्या हालचालींची ओळख पटवणे, रसद पुरवठा, उपकरणांची आगाऊ देखभाल, अचूक मदत पुरवणे, प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण आणि अर्थातच सायबर संरक्षण या आघाड्यांवर ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की ‘एआय’ सैनिकांची जागा घेणार नाही, तर सैनिकांच्या लढण्याच्या पद्धतीत आणि त्यांच्या क्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणेल.”
मानव आणि यंत्रांची युती
भविष्यातील रणांगणावर एकच सैनिक अनेक मानवरहित प्रणालींचे नियंत्रण करताना दिसू शकतो, असे सांगून ते पुढे म्हणाले, “सध्या गुप्त माहिती मिळवण्यासाठी स्वायत्त यंत्रणांचा आणि रसद पुरवठ्यासाठी रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे. पूर्वी ज्या बदलांचा वा पॅटर्नचा छडा लावण्यासाठी आपल्याला दिवस किंवा कित्येक महिने लागायचे, ते ‘एआय’ अवघ्या काही क्षणांत शोधून काढत आहे. भविष्य हे ‘मानव आणि यंत्रांच्या समन्वयाचे’ असेल.”
सध्या जग सातत्यपूर्ण संघर्षाच्या कालखंडातून जात असून भविष्यातील युद्धे पारंपरिक पद्धतीनुसारच लढली जातील असे नाही, असा इशारा त्यांनी दिला. “भविष्यात कोणतीही अचानक उद्भवणारी परिस्थिती आपल्याला परवडणारी नाही. हा धक्का केवळ सैन्याच्या हालचालींपुरता मर्यादित नसेल, तर तंत्रज्ञान आणि पर्यावरणातील बदलांमुळेही बसू शकतो. त्यामुळे आपल्यासाठी सर्तकता म्हणजे केवळ सीमेपलीकडील हालचालींवर लक्ष ठेवणे एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही”, असेही आहुजा यावेळी म्हणाले.
पारंपरिक क्षेपणास्त्र हल्ल्यांशिवायही सुरू होऊ शकते युद्ध
भविष्यातील युद्धांची सुरुवात पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनीच होईल असे नाही, याकडे लक्ष वेधताना लेफ्टनंट जनरल आहुजा म्हणाले, “उद्याचे युद्ध कदाचित थेट क्षेपणास्त्र डागून सुरू होणार नाही; त्याऐवजी सायबर हल्ला, उपग्रहांच्या कार्यात अडथळा निर्माण करणे, दळणवळण यंत्रणा ठप्प करणे आणि मानवी विचारप्रक्रियेवर प्रभाव टाकणाऱ्या ‘कॉग्निटिव्ह डोमेन’मधील फेरफार याद्वारेही त्याची सुरुवात होऊ शकते.”
