UP Election 2026 AI War: उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. २०१७ आणि २०२२ साली झालेल्या निवडणुकांमध्ये येथे भाजपाची सत्ता आली होती. सलग १० वर्षे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. २०१२ नंतर उत्तर प्रदेशमधील प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने यंदा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. भाजपाच्या हायटेक प्रचाराला जशास तसे प्रत्युत्तर देताना समाजवादी पक्षाकडून AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अखिलेश यादव यांचे AI व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

निवडणूक म्हटली की, भाजपाच्या प्रचार रणनीतीची चर्चा होते. सोशल मीडियापासून ते पारंपारिक माध्यमात भाजपाकडून आक्रमक प्रचार केला जातो. यंदा उत्तर प्रदेशमध्ये भाजपाशी संबंधित यंत्रणेने सुरुवातीला एआयचा वापर करून अखिलेश यादव यांच्याविरोधात काही व्हिडीओ तयार केले. त्यानंतर समाजवादीनेही याच तंत्रज्ञानाचा वापर करत जोरदार प्रत्युत्तर दिले.

अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातील एआय व्हिडीओ दाखवले. यात राम मंदिरात झालेल्या देणगीतील गैरव्यवहाराच्या व्हिडीओचा समावेश होता. ज्यामुळे आता भाजपातून तीव्र नाराजी उमटली आहे. या व्हिडीओत भगवी वस्त्रे परिधान केलेला इसम दान पेटीतून चोरी करताना दाखवले गेले होते.

अखिलेश यादव काय म्हणाले?

“AI चा वापर चांगल्या कामासाठी करायला हवा. शेतकरी आणि गरीबांवर येणाऱ्या संकाटाची चाहूल एआयच्या मदतीने मिळू शकते. त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. एआयचा चांगल्या कामासाठी वापर करण्याऐवजी सरकारमधील लोक जनतेचा पैसा वापरून काही अज्ञात हस्तकांद्वारे एआय व्हिडीओ बनवत आहेत. ज्यातून विरोधकांचा अपप्रचार केला जातो. त्यांनी एआय व्हिडीओ केला तर त्याचे उत्तरही एआय व्हिडीओद्वारे दिले जाईल”, अशी भूमिका अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती.

नव्या व्हिडीओमध्ये काय?

समाजवादी पक्षाच्या मीडिया सेलने आणखी एक नवीन व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. जो आता व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ९० च्या दशकातील हिंदी चित्रपटात नायक आणि खलनायक यांच्यातील संवाद ज्याप्रकारे असायचे, त्याप्रमाणे अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ आमनेसामने दाखवले आहेत. अखिलेश यादव यांचे पात्र आपल्या संवादातून योगी सरकारच्या काळातील चुकांचा पाढा वाचते. तर योगी आदित्यनाथ त्याची कबुली देतात.

आ रहा है पीडीए सरकार

अखिलेश यादव यांनी पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक यांना एकत्रित करून पीडीए ही संज्ञा मांडली आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत या वर्गाची संख्या अधिक आहे. एआय व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीचे कॅम्पेन सुरू केले आहे.

समाजवादीकडून अधिकृतपणे व्हिडीओ प्रसिद्ध

एआय व्हिडीओचा हल्ला-प्रतिहल्ला सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या हँडलवरून व्हिडीओ शेअर केले जात होते. मात्र समाजवादी पार्टी मीडिया सेल या अधिकृत हँडलवरून आता हे व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत.

खासदार रवी किशनही ट्रोल

गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी मध्यंतरी गोरखपूर हे स्पेनप्रमाणे विकसित झाल्याचे म्हटले होते. त्याचीही समाजवादी पक्षाने खिल्ली उडवली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका पत्रकार महिलेने योगी आदित्यनाथ यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र योगींनी त्याला उत्तर दिले नाही, यावरही एआय व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत भाजपाने तयार केलेल्या व्हिडीओंना खुळचट आणि बालिश प्रकार असल्याचे म्हटले. “त्यांनी फक्त मलाच नाही तर पत्नी डिंपल यादवलाही यात खेचले”, अशी नाराजीही व्यक्त केली. २०१२ ते २०१७ या काळात उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार होते. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना कसा अत्याचार होत होता, हे दाखविण्याचा प्रयत्न भाजपातर्फे काही जणांनी केला. मात्र आता समाजवादी पक्षही त्याला तोडीस तोड उत्तर देत आहे.