तमिळनाडूत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तमिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची त्यांनी घोषणा केली आहे. अण्णा द्रमुकच्या या खेळीमुळे भाजपासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. स्वबळावर भाजपाला तमिळनाडूत नशीब आजमावून पाहावं लागणार आहे. परंतु, अण्णा द्रमुक आणि भाजपा पुन्हा एकत्र येतील, असा विश्वासही भाजपा नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर द्रमुकचे नेते आणि तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
“अण्णा द्रमुकने भाजपाशी संबंध तोडले तरी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक विजयी होणार आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपाची युती तुटल्याचं के.पी. स्वामी यांनी जाहीर केलं आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपा यांची युती असो वा नसो, द्रमुकच जिंकणार आहे. तुम्ही लोकांना फसवू शकत नाहीत. ही युती तुटल्याचं तुमचे स्वतःचे कार्यकर्ते मान्य करणार नाहीत. का? कारण, तुमच्या माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची ईडीच चौकशी सुरू आहे”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. द्रमुकच्या तरुण कार्यकर्त्यांच्या बैठकीत उदयनिधी बोलत होते.
हेही वाचा >> अण्णा द्रमुकने युती तोडल्याने भाजपपुढे तमिळनाडूत आव्हान
“हे पहिल्यांदा घडत नाही. हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा करतील, पण निवडणुकीच्या वेळी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. कारण, एक दरोडेखोर आहे आणि दुसरा चोर आहे”, अशीही टीका उदयनिधी यांनी केली.
अण्णा द्रमुक एनडीएबाहेर
अण्णा द्रमुक भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले आहे. आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक समविचारी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्त्व करून लढवण्याचे पक्षाने जाहीर केले आहे. पक्षप्रमुख ई.के.पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन पक्ष निवडणूक लढवेल असे माजी मंत्री के.पी.मुनुस्वामी यांनी जाहीर केले.
पक्षाने एका ठरावात कोणाचाही नामेल्लेख न करता भाजपच्या प्रदेश नेतृत्त्वावर टीका केली आहे. द्रविडी चळवळीतील नेतृत्त्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठरावात करण्यात आला आहे. पक्षाचा रोख भाजप प्रदेशाध्यक्ष के.अण्णामलाई यांच्याकडे आहे.