पीटीआय, चेन्नई : तमिळनाडूमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी मंत्री आणि बंडखोर नेते सी. विजयभास्कर यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिकृत माहिती दिली.
पुदुकोट्टई जिल्ह्यातील विरालीमलाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विजयभास्कर हे मागील अण्णाद्रमुक सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. ते हे अण्णाद्रमुकमधील बंडखोर गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. १३ मे रोजी विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानात त्यांनी सत्ताधारी टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्याआधीही अण्णाद्रमुकचे चार आमदार राजीनामा देऊन टीव्हीकेमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे विजयभास्कर यांच्या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत संकट अधिक गडद झाल्याचे मानले जात आहे.
नेतृत्व म्हणजे अहंकार नव्हे
राजीनामा देण्यापूर्वी सी. विजयभास्कर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमधून पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व असलेल्या पलानीस्वामी यांच्यावर टीका केली. नेतृत्व म्हणजे हुकूमशाही किंवा अहंकार नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन जाणारी समर्पित भावना आहे. जे नेतृत्व पक्षासाठी अहोरात्र राबणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्यांची मने जिंकू शकत नाही, ते जनतेची मने कशी जिंकणार? जिथे भावनांचा आदर केला जात नाही, तिथे पुढील प्रवास तरी कसा शक्य आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
