तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अण्णा द्रमुकच्या (AIADMK) दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात धुमसणारी फूट आता प्रत्यक्षात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. पी. वेुलमणी आणि सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील एका मोठ्या गटाने मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, ते आज मंत्रिमंडळात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी (ईपीएस) यांचा आज ७२ वा वाढदिवस असून, याच दिवशी त्यांच्या हाताून पक्षाचे नियंत्रण निसटल्याचे चित्र आहे.
बंडखोर गटाचे नेते, माजी मंत्री सी. वे. षण्मुगम काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पक्षाने हा मोठा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण माजी कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम यांनी दिले आहे. चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. पी. वेुलमणी, सी. विजयभास्कर आणि आर. कामराज यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते. यावेळी षण्मुगम यांनी पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) यांच्यावर गंभीर आरोप केले. पलानीस्वामी हे पक्षाचा पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या द्रमुकच्या (DMK) मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.
ईपीएस यांची अवस्था ‘ओपीएस’ सारखी?
“ईपीएस यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात कठीण दिवस आहे. ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे, त्याच दिवशी पक्षाचे विभाजन होणे हे दुर्दैवी आहे,” अशी भावना त्यांच्या गटातील एका नेत्याने व्यक्त केली. ओ. पन्नीरसेल्वम (ओपीएस) यांना ज्याप्रमाणे ईपीएस यांनी बाजूला केले होते, आता ईपीएस यांची अवस्थाही तशीच होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लीमा रोझ यांची पडद्यामागून महत्त्वाची भूमिका
या राजकीय नाट्यामागे लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लीमा रोझ मार्टिन यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे जावई आधाव अर्जुन हे मुख्यमंत्री विजय यांचे जवळचे सहकारी आणि मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. लीमा रोझ यांनीच टीव्हीके (TVK) आणि अण्णा द्रमुकच्या बंडखोर गटात संवाद घडवून आणला. ५ मे रोजीच त्यांनी वाटाघाटी सुरू असल्याचे संकेत दिले होते, जे आता खरे ठरले आहेत.
विजय सरकारला मिळणार ‘स्थैर्य’
बंडखोर गट आज सायंकाळी ‘टीव्हीके’ नेत्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी देखील ‘सरकारी स्थैर्या’साठी या गटाचा पाठिंबा स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला ४७ जागा मिळाल्या होत्या. आता त्यातील मोठा हिस्सा बंडखोर गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
कॉर्पोरेट प्रभाव आणि ‘अर्थकारण’
या वेळची फूट ही केवळ जातीय समीकरणांवर (थेवर, गौंडर किंवा वन्नियार) आधारित नसून ती सत्ता आणि अस्तित्वासाठी असल्याचे बोलले जात आहे. आमदारांना फुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचेही आरोप होत आहेत. “बहुतेक आमदारांना आता केवळ डीएमके (DMK) आणि टीव्हीके (TVK) मध्येच भविष्य दिसत आहे,” असे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
ईपीएस यांच्यासोबत उरले मोजकेच शिलेदार
पक्षात एवढी मोठी फूट पडलेली असतानाही आर. बी. उदयकुमार, ओ. एस. मणियन, ॲग्री कृष्णमूर्ती, थलवाई सुंदरम आणि के. पी. मुनुसामी यांसारखे काही ज्येष्ठ नेते अजूनही पलानीस्वामी यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. २०१७ पासून अनेक संकटांमधून पक्षाला वाचवणाऱ्या ईपीएस यांची पकड अखेर त्यांच्या वाढदिवशीच सैल झाली आहे.
