काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (सोमवार) दावा केला की, एआयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांना देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पक्षाच्या सर्वोच्च पदासाठीच्या उमेदवारीबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, थरूर यांनी उत्तर केरळमधील पलक्कड येथील पट्टांबी येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचीही भेट घेतली. मात्र थरूर म्हणाले की, गांधी त्यांच्या गृहजिल्ह्य़ात असल्याने ही केवळ शिष्टाचाराची भेट होती.

याचबरोबर “मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला दिसेल. मला बहुतांश राज्यांतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्यास मी निवडणूक लढवणार आहे. देशाच्या विविध भागातून अनेकांनी मला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली आहे.” असंही यावेळी थरूर यांनी सांगितलं.

३० सप्टेंबरनंतरच चित्र स्पष्ट होणार –

थरूर म्हणाले “निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. परंतु उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर (३० सप्टेंबर) चित्र स्पष्ट होईल. शनिवारी काँग्रेस मुख्यालयातून निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज शशी थरूर यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, “उमेदवाराने आत्मविश्वासाने निवडणूक लढवली पाहिजे. मला अर्ज मिळाला आहे. मी लोकांना भेटत आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे.”

थरूर यांनी सांगितले की, त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे आणि या तिघांनीही मला थेट सांगितले आहे, की त्यांचा काहीही आक्षेप नाही. याशिवाय निवडणूक लढवण्यासाठी केरळमधील कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. थरूर यांनी मागील सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती.

१७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार –

काँग्रसेने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मतदान करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aicc president election then you will see the support i will get shashi tharoor msr
First published on: 26-09-2022 at 14:36 IST