देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इंधनाच्या वाढत्या दरांवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. मुघल, औरंगजेब आणि ताजमहल बांधणारे महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या इंधनदरांसाठी जबाबदार असतील असं ते म्हणाले आहेत. प्रचारसभेत संबोधित करताना ओवेसी यांनी डिझेल १०२ रुपये लीटर झालं असेल तर नक्कीच यासाठी मोदी नाही तर औरंगजेब जबाबदार असेल असं म्हटलं.

ते म्हणाले की, “जर भारतात तरुण बेरोजगार असतील, महागाई आकाशाला भिडत असेल आणि डिझेल एक लीटर १०२ रुपये झालं असेल तर नक्कीच यासाठी औरंगजेब जबाबदार आहे, मोदी जबाबदार नाहीत. तरुणांकडे नोकरी नाही यासाठी बादशाह अकबर जबाबदार आहे. पेट्रोल १०४ रुपये लीटर झालं आहे त्यासाठी ताजमहाल बांधणारे जबाबदार आहेत. जर त्यांनी ताजमहाल उभा केला नसता तर पेट्रोल ४० रुपयांना मिळालं असतं”.

“ताजमहाल, लाल किल्ला बांधून त्यांनी चूक केली. ते पैसे त्यांनी वाचवायला पाहिजे होते. २०१४ मध्य मोदी आल्यानंतर त्यांच्याकडे सोपवायला हवे होते,” असाही टोला त्यांनी लगावला.

ओवेसी यांची महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या इंधन दरावरुन टीका

ओवेसी यांनी यावेळी भाजपा सरकार प्रत्येक गोष्टीसाठी मुस्लीम आणि मुघलांना जबाबदार धरत असल्याची टीका केली. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, “भाजपाला फक्त मुघल आणि पाकिस्तान दिसतात. भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तानचा संदेश नाकारला हे सत्य आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत असून मुस्लिम कधीच आपली मातृभूमी सोडणार नाहीत”.

“तुम्ही कितीही घोषणा केल्यात तरी आमचं भारतावर प्रेम आहे आणि आम्ही भारत कधीच सोडणार नाही. आम्ही इथेच राहणार आणि इथेच शेवटचा श्वास घेणार,” असंही ओवेसी यांनी सांगितलं.