काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी दोन दिवसांच्या तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर आणि सत्ताधारी पक्ष तेलंगण राष्ट्र समितीच्या नेत्यांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

“ते मुख्यमंत्री नाहीत, तर स्वतःचं ऐकणारा राजा, TRSसोबत काँग्रेस युती करणार नाही”; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले, “आता राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत. हिंमत असेल तर या हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा, नाहीतर मेडकमधून निवडवणूक लढा. पण तुम्ही वायनाडमध्येही हरणार आहात,” असा टोला ओवेसी यांनी राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी तेलंगणा दौऱ्यावर असताना त्यांनी आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याची ओवेसी यांनी खिल्ली उडवली आहे.

केसीआर मुख्यमंत्री नाहीत तर स्वतःच्या मनाचं ऐकणारा राजा –

तेलंगणामधील सत्ताधारी पक्ष टीआरएससोबत काँग्रेसची कोणतीही युती होणार नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांनी तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीसोबत युतीची कोणतीही शक्यता नाकारली आहे. यावेळी बोलताना त्यांनी टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ते मुख्यमंत्री नसून लोकांचा आवाज न ऐकणारा राजा आहे, अशी टीका केली होती.

“असं म्हटलं जातं की तेलंगणात मुख्यमंत्री आहे, पण खरं तर तो मुख्यमंत्री नसून ‘राजा’ आहे, जो लोकांचा आवाज ऐकत नाही तर फक्त स्वतःचं ऐकतो. कोणताही मुख्यमंत्री लोकांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतो पण राजाला लोकशाहीशी काही देणेघेणे नसते आणि त्याला जे वाटते तेच करतो,” असे म्हणत राहुल गांधींनी केसीआर यांच्यावर टीका केली होती.