प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन राजस्थानमध्ये ताणवपूर्ण परिस्थिती असतानाच यावर आता एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयपूरमध्ये एका टेलरच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्या तलवारीने वार करुन त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून त्यांनी तो समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही केंद्रीय तपास यंत्रणांना या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले आहेत. या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता ओवेसींनी यावरुन पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“उदयपूरमध्ये जे झालं त्याचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. आम्ही अपेक्षा करतो की राजस्थान सरकार कठोर कारवाई करेल. पोलीस अधिक सतर्क असते तर हा प्रकार घडला नसता. कट्टरतावाद वाढतोय,” असं ओवेसी यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “नुपूर शर्माला अटक झाली पाहिजे. केवळ निलंबन हे पुरेसं नाहीय,” असंही त्यांनी म्हटलंय.

कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचे नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले, असे पोलिसांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

या हल्ल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर उदयपूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांनी आंदोलन करून रस्त्यावर जाळपोळ सुरू केली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंह घुमारिया यांनी ६०० पोलिसांची अतिरिक्त कुमक उदयपूरमध्ये पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले असून हल्ल्याचा व्हिडीओ प्रसारित न करण्याचेही आवाहन केले आहे.

उदयपूरमधील हत्येची ही घटना म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए ) पथक उदयपूरला पाठविण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi first comment on udaipur tailor death case scsg
First published on: 29-06-2022 at 14:04 IST