“तालिबानसोबत पडद्यामागे लपून लपून…”; ओवेसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, तालिबान-पाकिस्तान संबंधांवरही केलं भाष्य

आयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर तालिबानशी सुरु असणाऱ्या चर्चेवरुन टीका केलीय.

PM Modi And Asaduddin Owaisi
पत्रकारांशी बोलताना साधला केंद्र सरकारवर निशाणा

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भारत आणि तालिबानमध्ये अधिकृत चर्चा सुरु झालीय. या चर्चेसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहितीही दिली आहे. मात्र आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. या चर्चेसंदर्भात भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओवेसी यांनी केलीय. भारत सरकार तालिबानसोबत लपून छपून संबंध का ठेवत आहे?, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केलाय.

पत्रकारांशी चर्चा करताना ओवेसींनी या सरकारला लाज का वाटतेय. ते जवळही येत नाहीय आणि पडद्यामधून बाहेरही येत नाहीयत. पडद्याआड लपून लपून का प्रेम का केलं जात आहे?, उघडपणे याबद्दल बोला. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात सरकारला प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

नक्की वाचा >> अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार तालिबान सरकार; दहशतवाद्यांकडे शिक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री पदाची जबाबदारी

पाकिस्तान तालिबान संबंधांबद्दलही केलं भाष्य…

पाकिस्तान ताबिलान्यांना मदत करत असल्याचं सांगत ओवेसींनी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपण त्यांना आपल्याकडे बोलवून चहा पाजतो, बिस्कटं खाऊ घालतो, कबाब खाऊ घालतो. जर पाकिस्तान त्यांचे तालिबानसोबतचे संबंध उघड करत असेल तर आपण त्यांना इथे बोलवून चहा पाजला पाहिजे का? तालिबान आणि पाकिस्तान हे असं नाही आहे जे कधी संपणार नाहीय. मात्र भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात म्हणाले…

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये दौरे करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ७ सप्टेंबर रोजी फैजाबाद, ८ सप्टेंबर रोजी सुल्तानपुर आणि ९ सप्टेंबर रोजी बाराबंकीचा दौरा करणार असल्याचं ओवेसी म्हणाले. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी उत्तर प्रदेशचे अधिक दौरे करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आदित्यनाथ सरकारला पराभूत करणार आहोत, असं ओवेसी म्हणाले.

नक्की वाचा >> RSS हे भारतामधील तालिबानी, धर्माच्या नावावर देशात फूट पाडतात; RJD च्या नेत्याची टीका

मोदींनी घेतली तीन तास बैठक

बुधवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलवली होती. ही बैठक तीन तास सुरु होती. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा उपस्थित होते. तालिबानसंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे हे भारताकडून लवकरच स्पष्ट केलं जाणार असल्याचं सांगितलं जात असून त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

कतारमध्ये झाली चर्चा…

भारताने तालिबानशी यापूर्वीच चर्चा सुरु केलीय. अमेरिकेच्या संपूर्ण सैन्यमाघारीच्या दिवशी, मंगळवारी भारताने अधिकृतपणे तालिबानशी उच्चस्तरीय चर्चा केली. भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई यांच्याशी चर्चा करून तेथील भारतीयांच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादाच्या मुद्दय़ावर चिंता व्यक्त केली. दोन दशकांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताची अधिकृत भूमिका काय आहे, याबाबत उत्सुकता असताना भारताने मंगळवारी तालिबानशी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र विभागाने दिली. तालिबानच्या विनंतीनुसार भारताच्या दोहा दूतावासात भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचे नेते शेर मोहम्मद यांच्यात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

भारताची काय चर्चा झाली?

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, त्यांना मायदेशी आणण्याची मोहीम, भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांची वाहतूक व्यवस्था आदींसह दहशतवादाच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. भारतविरोधी कारवाया, दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू देऊ नये, असे मित्तल यांनी यावेळी नमूद केले. या सर्व मुद्दय़ांवर शेर मोहम्मद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

कृतिगटाची स्थापना

अफगाणिस्तानमधील संघर्षांच्या परिस्थतीत भारताच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या कृतिगटाला केली होती. याबाबत गेल्या काही दिवसांपासून उच्चस्तरीय बैठकाही सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने भारत-तालिबान चर्चा ही महत्त्वाची घटना मानली जाते.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

लवकरच तालिबान करणार सरकारची घोषणा…

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानने सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा केल्याचा दावा केलाय. लवकरच तालिबान अफगाणिस्तानमधील नवीन सरकारची घोषणा करणार आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनामुल्ला समांगानी यांनी हिबतुल्लाह अखुंदजादा यांचीही नेतेपदी वर्णी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aimim chief asaduddin owaisi slams modi government over talk with taliban scsg