‘मशीद इतरत्र हलवली जाऊ शकते’, ही भूमिका भोवली!

सैयद सलमान हुसेन नडवी यांची एआयएमपीएलबीतून हकालपट्टी

सैयद सलमान हुसेन नडवी यांची एआयएमपीएलबीतून हकालपट्टी

अयोध्या वादाच्या संबंधात श्री श्री रविशंकर यांची भेट घेणारे आणि शरियानुसार मशीद इतरत्र हलवणे शक्य असल्याचे सांगणारे सैयद सलमान हुसेन नडवी यांना अ.भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळातून (एआयएमपीएलबी) हकालपट्टी करण्यात आली आहे.

मौलाना सलमान नडवी हे आता मंडळाचे सदस्य नाहीत. संघटनेचा राजीनामा देण्याचा त्यांचा निर्णय उपसमितीने मान्य केला आहे, असे एआयएमपीएलबीने रविवारी त्यांच्या ट्विटर खात्यावर जाहीर केले. मात्र या मुद्दय़ावर नडवी यांनी मंडळाच्या मतांशी असमहती दर्शवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ‘कारवाई’ करण्यात आल्याचे मंडळाचे सदस्य कासीम रसूल इल्यास यांनी सांगितले.

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात गेल्या आठवडय़ात श्री श्री रविशंकर यांना भेटल्यानंतर, मशीद हलवण्यास शरियानुसार परवानगी असल्याचे नडवी यांनी सांगितले होते.

या मुद्दय़ावर मंडळाच्या मतांपासून नडवी यांनी फारकत घेतली असल्याचे सांगून इल्यास म्हणाले की, मंडळाने याबाबत भूमिका घेऊन कारवाई केली आहे. हा मंडळाचा एकमताचा निर्णय आहे. नडवी आता मोकळे आहेत.

मशीद हे ‘अल्लाचे घर’ आहे. ती नेहमी तशीच राहील. ती हलवली किंवा विकली जाऊ शकत नाही, असेच शरिया सांगते. नडवी यांची भूमिका याच्याशी विसंगत असून, आपण आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, असे इल्यास यांनी पत्रकारांना सांगितले.

‘बाबरी मशीद प्रकरणात जमिनीची देवाणघेवाण अशक्य’

हैदराबाद : बाबरी मशीद ही अनंतकाळ राहील, मुस्लीम त्याच्या बदल्यात जमिनीची देवाणघेवाण करणार नाहीत, अशी भूमिका रविवारी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डने घेतली आहे. बाबरी मशीद ही मुस्लिमांच्या श्रद्धेचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट करीत, मुस्लीम त्यावरील दावा कधीही सोडणार नाहीत, असे त्यांनी बैठकीच्या अखेरच्या दिवशी निवेदनात स्पष्ट केले आहे. मौलाना रबे हुसेन नदवी यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चाललेल्या बैठकीत चारशे सदस्य उपस्थित होते. बाबरी मशिदीच्या फेरउभारणीसाठी संघर्ष सुरूच राहील असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाकबाबत केंद्राने जे विधेयक आणले आहे ते मुस्लीमविरोधी तसेच शरियत व घटनाविरोधी असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aimplb member maulana syed salman hussain nadvi says shifting of mosque is permissible