ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या संघटनेने रविवारी ईश्वरनिंदा कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. या कायद्यानुसार प्रेषित मोहम्मद तसंच मुस्लीम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असं या संघटनेचं म्हणणं आहे. तसंच आपल्यावर समान नागरी कायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लादू नये, अशी विनंतीही या संघटनेकडून करण्यात आली आहे.

मुस्लीम समाजासंदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तसंच मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या संघटनेने सोशल मीडियावर मुस्लिमद्वेषी पोस्ट्स लिहिणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संघटनेची दोन दिवसीय परिषद कानपूरमध्ये रविवारी पार पडली. यात या संघटनेचे २०० सदस्य सहभागी झाले होते. या परिषदेत संमत करण्यात आलेल्या ठरावात या मागणीचा समावेश आहे.

या परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, काही हिंदू, शीख आणि इतर मुस्लिमेतर उच्चशिक्षित लोकांनी सातत्याने प्रेषित मोहम्मद यांची महानता मान्य केली आहे. इस्लामच्या शिकवणीनुसार, मुस्लिमांनीही इतर धर्मीयांच्या पवित्र धार्मिक गोष्टींबाबत अपमानास्पद भाष्य करणं टाळायला हवं. काही नाठाळ लोकांनी प्रेषित मोहम्मद यांचा जाहीरपणे अपमान केला. मात्र तरीही सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, हे खेदजनक आहे. सांप्रदायिक शक्तींची अशी भूमिका अस्वीकारार्ह आहे, असं या ठरावात नमूद करण्यात आलं आहे.

समान नागरी कायद्याबद्दल ही संघटना म्हणते…

समान नागरी कायदा हा भारतासारख्या धार्मिक वैविध्य असलेल्या देशात योग्य आणि उपयोगी नाही. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिमांच्या विरोधात विखारी प्रोपगंडा राबवला जात असल्याचं या संघटनेने स्पष्ट केलं आहे.