Ranchi air ambulance crash 2026 : रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यात एका जोडप्याचाही मृत्यू झाला आहे, ज्यांनी हेच चार्टर विमान भाड्याने घेण्यासाठी ८ लाखांचं कर्ज घेतलं होतं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
झारखंडच्या चांदवा गावात राहणारे संजय कुमार (४१) यांच्या हॉटेलमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने ते गेल्या सोमवारी भाजले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबियांनी कर्ज काढले. मालमत्ता, जमीन विकून, नातेवाईकांकडून कर्ज घेतलं. तसंच, झारखंडमधून दिल्लीत हलवण्याकरता त्यांना एअर अॅम्ब्युलन्सची गरज होती.
पायलटमध्ये कोण कोण होतं?
दिल्लीस्थित चार्टर सेवा रेडबर्ड एअरवेजच्या बीचक्राफ्ट सी ९० विमानसेवा भाड्याने घेण्याकरता त्यांनी ८ लाखांचं कर्ज काढलं. झारखंडमधून संजय, त्यांची पत्नी अर्चना आणि ध्रुव नावाचा नातेवाईक या विमानातून दिल्लीत येत होते. त्यांच्याबरोबर पायलट-इन-कमांड कॅप्टन विवेक विकास भगत आणि सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, डॉ. विकास कुमार आणि सचिन कुमार मिश्राही होते.
२३ मिनिटांत जोडप्याचा करुण अंत
रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर २३ मिनिटांनी एअर ट्राफिक कंट्रोलशी विमानाचा संपर्क तुटला. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता सर्व सातही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
