पीटीआय, अहमदाबाद, नवी दिल्ली
एअर इंडियाचे ‘ए-११७१’ हे विमान १२ जून २०२५ रोजी दुपारी अहमदाबादच्या आकाशात झेपावले आणि अवघ्या ३२ सेकंदांत जमिनीवर कोसळले. त्यात काही क्षणांत २६० जीवांचा बळी गेला. या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. या काळात कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली गेली, परंतु अपघाताच्या मुख्य कारणाचा शोध घेणारा अंतिम तपास अहवाल अद्याप कागदावरच असल्याने, मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू आणि वेदना आजही कायम आहेत.
लंडनकडे निघालेले ‘बोईंग ७८७ ड्रीमलाइनर’ विमान उड्डाणानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण स्विच अचानक ‘रन’वरून ‘कटऑफ’ स्थितीत गेल्याचा उल्लेख होता. त्यामुळे इंजिनांना इंधनपुरवठा बंद झाला आणि विमानाची शक्ती क्षणात कमी झाली. मात्र हे स्विच का बदलले आणि त्यामागे नेमके कारण काय होते, याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. एअर इंडिया आणि टाटा समूहाने पीडित कुटुंबांना सुमारे ३०० कोटी रुपयांची मदत व भरपाई वितरित केली आहे.
दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी तपास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार काटेकोरपणे सुरू असल्याचे शुक्रवारी सांगितले. मे महिन्यात त्यांनी तपास अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले होते. मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही अंतिम अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांसह संपूर्ण विमानवाहतूक क्षेत्राची नजर आता या अहवालाकडे लागली आहे.
अनेक कुटुंबांना धक्का कायम
दोन महिन्यांपूर्वी ३० पीडित कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ आणि ‘ब्लॅक बॉक्स’मधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. अमेरिकेतील एका विधी संस्थेनेही तांत्रिक माहिती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. ब्रिटनमधील अनेक कुटुंबे आजही मानसिक आणि आर्थिक धक्क्यातून बाहेर आलेली नाहीत. काहींनी नुकसानभरपाई स्वीकारली असली तरी त्यांच्या मनावर झालेल्या जखमा अजून भरल्या गेलेल्या नाहीत.
जीव वाचविणे हेच ध्येय होते!
या दुर्घटनेत बचावकार्य करणाऱ्या अहमदाबाद अग्निशमन दलासाठीही तो दिवस विसरणे अशक्य आहे. विमानात तब्बल १.२५ लाख लिटर इंधन होते. त्यामुळे अपघातानंतर जवळपास हजार अंश सेल्सियस तापमान तयार झाले. दाट धूर, ज्वाळा, स्फोटांचा धोका आणि ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक अशा परिस्थितीत ६५० कर्मचारी आणि ९१ वाहनांनी जवळपास दहा तास अखंड बचावकार्य केले. चार इमारतींमध्ये अडकलेल्या २८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
