पीटीआय, नवी दिल्ली

एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाला झालेल्या अपघाताचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे ‘विमान अपघात चौकशी ब्यूरो’ने (एएआयबी) शुक्रवारी सांगितले. विमान अपघाताला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले, त्या पार्श्वभूमीवर ‘एएआयबी’ने अपघाताविषयी एक अंतरिम निवेदन प्रसिद्ध केले आणि तपासात लक्षणीय प्रगती केल्याचा दावा केला.

गेल्या वर्षी, १२ जूनला अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे एआय-१७१ हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान ३२ सेकंदांमध्येच कोसळले. त्यामध्ये विमानातील २४१ जण आणि जमिनीवरील १९ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांमध्ये भारतासह ब्रिटन, पोर्तुगाल आणि कॅनडाच्या नागरिकांचा समावेश होता. अपघाताला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही मृतांच्या नातेवाईकांना तपास अहवालाची प्रतीक्षा करावी लागत आहे. हा तपास आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या (आयसीएओ) परिशिष्ट १३अंतर्गत विहित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आढावा आणि सल्लामसलतीने केला जात असल्याचे ‘एएआयबी’चे म्हणणे आहे.

मात्र, ‘एएआयबी’ने प्रसिद्ध केलेल्या अंतरिम निवेदनात तपासाची स्थिती किंवा आतापर्यंत हाती लागलेली माहिती याबद्दल कोणतेही तपशील दिले गेलेले नाहीत. तपास पथक अपघाताशी संबंधित सर्व तांत्रिक, प्रचालनात्मक, संघटनात्मक आणि मानवी घटकांचा विस्ताराने आणि कसून तपास करत आहे, असे या ‘एएआयबी’कडून सांगण्यात आले. विमानाची प्रणाली, फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती, इंजिनशी संबंधित घटक, देखभाल आणि परिचालनविषयक नोंदी, तसेच तपासाशी संबंधित अन्य पुराव्यांची तपासणी आणि विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती संस्थेने दिली.

‘वाचलेल्या प्रवाशाच्या जबाबाकडे कानाडोळा’

मुंबई : या अपघातातून वाचलेल्या एकमेव प्रवाशाच्या जबाबाला पुरेसे महत्त्व दिले गेले नाही असा आरोप भारतीय वैमानिक संघटनेचे (एफआयपी) अध्यक्ष सी. एस. रंधवा यांनी केला आहे. विमानातील दिवे लुकलुकत होते, असे या अपघातातून वाचलेले विश्वास कुमार रमेश यांनी आपल्या जबाबात नोंदवले होते. हा महत्त्वाचा पुरावा विचारात घेऊन विमानात विद्युत बिघाड झाला होता का याचा तपास केला जाऊ शकतो, असे रंधवा यांनी सुचवले. एफआयपीने नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, ‘एएआयबी’ आणि नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला आहे, पण त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही, अशी तक्रार रंधवा यांनी केली.