scorecardresearch

एअर इंडियाचा ४७० विमाने खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार

एअर इंडिया तब्बल १७ वर्षांनंतर आपल्या ताफ्यात ४७० विमानांचा समावेश करत आहे.

air india
एअर इंडिया (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

टाटा समूहाच्या एअर इंडियाने हवाई वाहतूक क्षेत्रातला सर्वात मोठा करार केला आहे. अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस या कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा मोठा करार केला आहे. यापैकी एअरबसकडून २५० नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून २२० मोठी विमाने घेण्यात येणार आहेत. टाटा समूहाने एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापनात खूप व्यापक बदल केले आहेत. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यात व्हर्चुअल बैठक झाल्यानंतर २५० विमान खरेदी करण्याचा करार झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा करार असून भारत-फ्रांस यांच्यामधील भागीदारीचा ही महत्त्वाची उपलब्धी आहे. तर जो बायडेन यांनी बोईंग – एअर इंडिया यांच्यामध्ये २२० विमानांच्या खरेदीचा करार झाला असल्याची घोषणा केली.

टाटा समूहाला एअर इंडियाची पुन्हा मालकी मिळाल्यानंतर कंपनीमध्ये खूप मोठे बदल दिसत आहेत. त्यामुळेच एअर इंडियाच्या ताफ्यात नवीन विमानांचा भरणा केलेला दिसून येत आहे. एअरबस – एअर इंडिया करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन आणि एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइलाम फाउरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी फाउरी यांनी या कराराला ऐतिहासिक करार असल्याचे सांगितले.

त्यानंतर एअर इंडिया आणि अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या दरम्यानही मोठा करार झाला. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी मोदी आणि बायडेन यांच्यात फोनवरुन यासंदर्भात चर्चा झाली. दोघांनीही या कराराबाबत आनंद व्यक्त केला. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने उचलले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले.

व्हाईट हाऊसने बोईंग आणि एअर इंडिया दरम्यान झालेल्या कराराची माहिती दिली. यामध्ये एकूण २२० विमाने विकत घेतली जाणार आहेत. यापैकी १९० बी७३७ मॅक्स, २० बी७८७ आणि १० बी७७७ एक्स विमानांचा समावेश आहे. हा करार तब्बल 3३४ बिलियन डॉलरचा असल्याची माहिती मिळत आहे. या करारामध्ये अतिरिक्त ५० बोईंग ७३७ आणि २० बोईंग ७८७ असे ७० विमान आणखी खरेदी करण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बोईंगकडून घेतलेल्या विमानांची संख्या २९० एवढी होईल आणि त्याची किंमत ४५.९ बिलियन डॉलर असेल.

एअर इंडियाने १७ वर्षांनंतर नवीन विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी २००५ साली १११ विमान विकत घेण्याची ऑर्डर देण्यात आली होती. यापैकी ६८ विमान बोईंगकडून तर ४३ विमान एअरबसकडून विकत घेण्यात आली होती. एअरबस सोबत झालेल्या या कराराची पुर्ती यावर्षीच्या अखेरपर्यंत होईल. एअरबसकडून या वर्षीच्या अखेरीस एअर इंडियाला विमाने मिळतील. २५० पैकी ४० मोठ्या आकाराची विमाने असणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 10:33 IST