इराण युद्ध आणि त्यानंतर ओढवलेले इंधन पुरवठ्याचे संकट आता अधिक गहिरे होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्यानंतर त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला पाहायला मिळत आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या आघाडीच्या विमान कंपन्यांनी इंधन दरवाढीमुळे मोठा निर्णय घेतला असून देशाअंतर्गत उड्डाणे कमी केली आहेत. जून आणि ऑगस्ट महिन्यात फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना अधिकचे भाडे भरून विमान प्रवास करावा लागू शकतो.

उन्हाळा असल्यामुळे आणि जून महिन्यात सुट्ट्यांवरून घरी परतण्यासाठी अनेकजण विमान प्रवास करत असतात. देशाअंतर्गत पर्यटनाचा हा महत्त्वाचा काळ असताना विमान कंपन्यांनी उड्डाणे कमी केल्यामुळे हवाई प्रवास करू इच्छिणाऱ्यांना अधिक भाडे मोजावे लागू शकते.

एअर इंडियाकडून जून आणि जुलै महिन्यात देशाअंतर्गत उड्डाणाच्या वेळापत्रकात २२ टक्के कपात करत आहे. एअर इंडियाकडून दर दिवशी ५०० देशाअंतर्गत उड्डाणे घेतली जातात. यात २२ टक्क्यांची घट केल्यामुळे आता दररोज ११० विमाने उडणार नाहीत.

इंडिगोकडून दिवसाला २,२०० विमाने चालवली जातात. त्यांनीही देशांतर्गत विमान सेवेत ५ ते ७ टक्क्यांची घट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्यांचीही ११० उड्डाणे कमी होतील.

दरम्यान एअर इंडिया लिमिटेडची उपकंपनी आणि इकॉनॉमी क्लास मॉडेलवर चालणारी कमी खर्चाची विमान कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसही त्यांच्या रोजच्या ३४० उड्डाणापैकी १० टक्के कपात करणार आहे.

मुंबई, दिल्ली, बंगळुरूला बसणार फटका

देशाअंतर्गत विमानांचे उड्डाण रद्द केल्यामुळे ज्या शहरांमध्ये अधिक उड्डाणे होत असतात त्यांना मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांना सर्वाधिक फटका बसणार आहे. या शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक होत असते. या शहरांच्या विमानतळाहून अनेक व्यावसायिक उड्डाणे होत असतात. जर देशाअंतर्गत उड्डाणे पुरेशी झाली नाहीत तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी निघालेल्या प्रवाशांनाही तोटा होऊ शकतो.

मुंबईहून जयपूर, गोवा, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, पटना आणि भोपाळ या मार्गावरील उड्डाणे कमी होणार आहेत. तर दिल्लीहून मुंबई, गोवा, बंगळुरू हैदराबाद आणि हैदराबाद, कोची आणि कोलकाता या शहरातील उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत.