Air India Dreamliner Grounded After Fuel Switch Moves From Run To Cutoff : एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाचे इंजिन सुरू करत असताना डावे फ्यूल कंट्रोल स्विच दोनदा ‘रन’ स्थितीत न राहता ते ‘कटऑफ’ स्थितीमध्ये गेले. त्यानंतर हे विमान ग्राउंड करण्यात आले आहे. फ्लाइट एआय १३२ ही लंडन येथील हिथ्रो विमानतळावरून बंगळुरूसाठी उड्डाण करणार होती.
“आमच्या एका वैमानिकाने बोईंग ७८७-८ विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विचमधील एका संभाव्य बिघाडाबाबत सांगितल्याबद्दल आम्हाला माहिती आहे,” अशी माहिती विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. दरम्यान ही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर, आम्ही संबंधित विमान ग्राउंड केले आहे आणि प्राधान्याने त्या वैमानिकाने उपस्थित केलेल्या शंकांची तपासणी करण्यासाठी OEM ला यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे, असेही या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक नियामक संस्था म्हणजेच DGCA ला देण्यात आली आहे.
यापूर्वी डीजीसीएने आदेश दिल्यानंतर एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विचेसची तपासणी केली होती, मात्र त्यांना कोणताही बिघाड आढळून आला नव्हता.
“एअर इंडियामध्ये आमचे प्रवासी आणि क्रू यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असेही विमान कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
जुलै २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया ड्रीमलायनर विमान दुर्घटनेच्या तपासकर्त्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात फ्युएल स्विचबाबत एक धक्कादायक बाब समोर आली होती. या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच त्याचे फ्युएल कंट्रोल स्विचेस काही क्षणांसाठी बंद झाले होते, ज्यामुळे इंजिनचा इंधन पुरवठा बंद झाला होता. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता.
फ्युएल स्विच काय असते?
विमानातील या फ्युएल स्विचेसच्या माध्यमातून विमानाच्या इंजिनमध्ये जाणारा इंधनाचा प्रवाह रेग्युलेट केला जातो. याचा वापर जमिनीवर असताना इंजि सुरू करणे किंवा बंद करण्यासाठी वैमानिकांकडून केला जातो. तसेच जर विमान हवेत असेल आणि इंजिन फेल झाले तर मॅन्युअली इंजिन बंद करण्यासाठी किंवा ते रिस्टार्ट करण्यासाठी देखील या स्विचेसचा वापर केला जातो.

