मुंबई : युद्धामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे अडीच हजार उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या पश्चिम आशियात एअर इंडिया नेहमीच्या वेळापत्रकाच्या केवळ ३० टक्के उड्डाणे करत आहे.
दरम्यान, या युद्धामुळे एअर इंडियाला किती आर्थिक फटका बसला आहे, हे अद्याप पूर्णपणे जाणवलेले नाही, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. आम्हाला जवळपास २,५०० विमाने रद्द करावी लागली आहेत, असे विल्सन यांनी सांगितले.
युद्धामुळे आखाती देशांनी हवाई निर्बंध घातल्याने जगभरातील हवाई वाहतूक कोलमडली आहे. पश्चिम आशिया हा भारताच्या विमान कंपन्यांसाठी, सर्वाधिक व्यग्र प्रदेश आहे. भारताला युरोप, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेशी जोडणारा हा प्रमुख हवाई मार्ग आहे. हा मार्गच सध्या बंद असल्याने एअर इंडियावर विपरित परिणाम झाला आहे. जेट इंधनाच्या किमती दुप्पटीहून अधिक झाल्याने, युद्धाचा हवाई क्षेत्रावर आर्थिक परिणाम होऊ लागला आहे. यातील बहुतांश परिणाम पुढच्या महिन्यापासूनच जाणवणार आहे. दरम्यान वाढत्या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी विमान कंपन्यांनी नवीन तिकिटांवर आधीच इंधन अधिभार लावला आहे.
विमान प्रवासाची मागणी घटली
युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाची मागणी कमी झाली आहे. विमान कंपन्यांनी तिकिट दरात प्रचंड वाढ केली आहे. तसेच युद्धामुळे प्रवासी विमान प्रवास टाळत आहेत. इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे काही जागतिक विमान कंपन्या प्रवासी क्षमता कमी आहेत. तर
दुसरीकडे प्रवासी मागणीनुसार युरोप आणि उत्तर अमेरिकेत विमान कंपन्या विमान सेवा देत आहेत.
