मुंबई : एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय महासंचालक (एमडी) कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा दिला असल्याची घोषणा एअर इंडियाने मंगळवारी केली. विल्सन यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून तोपर्यंत त्यांना पदाचा कारभार सांभाळण्यास सांगण्यात आले आहे.
मूळचे न्यूझीलंडचे असणाऱ्या विल्सन यांनी यापूर्वी सिंगापूर एअरलाईन्समध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. ते गेल्या चार वर्षांपासून एअर इंडियाचे ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ होते. एअर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “विल्सन यांनी २०२४मध्येच कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना २०२६मध्ये पायउतार होण्याचा इरादा कळवला होता.” सप्टेंबर २०२२मध्ये एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यानंतर विल्सन यांनी कंपनीची धुरा हाती घेतली होती.
एअर इंडियाची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने काहीच दिवसांपूर्वी विल्यम वॉल्श यांची ‘सीईओ’पदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता एअर इंडियातही मोठा बदल होत आहे. देशांतर्गत समस्या आणि पश्चिम आशियातील युद्धामुळे उड्डाणांवर झालेला परिणाम यांचा फटका या दोन्ही कंपन्यांना बसत आहे. एअर इंडियासमोर सातत्याने होणारा तोटा आणि गेल्या वर्षी अहमदाबादमधील अपघातानंतर वाढवण्यात आलेली नियमन छाननीची आव्हाने आहेत. जून २०२५मध्ये झालेल्या अपघातात २५०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
जवळपास ६०० विमानांच्या मागणीची पूर्तता २०२७पासून सुरू होण्यास आता थोडाच कालावधी उरला आहे. अशा वेळी, एअर इंडियाच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याची सूत्रे दुसऱ्याच्या हाती सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. – कॅम्पबेल विल्सन, ‘सीईओ’ आणि ‘एमडी’, एअर इंडिया
