Air India Plane एअर इंडियाच्या विमानांचं चाललंय काय? असा प्रश्न सध्या लोक विचारत आहेत. १२ जूनला जी दुर्घटना घडली त्यात २४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. गुजरातहून ते विमान लंडनला चाललं होतं आणि काही सेकंदात ते कोसळलं. या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत दरम्यान आणखी एक घटना समोर आली आहे. एअर इंडियाचं दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारं विमान तांत्रिक बिघाडामुळे ९०० फुटांपर्यंत खाली आलं होतं. सुदैवाने हे विमान कोसळलं नाही, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली.
नेमकी घटना काय घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इंडिया बोइंग 777 या विमानाने उड्डाण केलं. हे विमान दिल्लीहून व्हिएन्नाला चाललं होतं. त्यानंतर काही मिनिटांताच हे विमान तांत्रिक बिघाडामुळे खाली येऊ लागलं. वैमानिकाला स्टॉल वॉर्निंग, ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टिम, जीपीएस सिंक या बाबतची माहिती कॉकपिटमध्ये मिळाली. ज्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड आहे हे त्याला कळलं. १४ जून रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पहाटे २ वाजून ५६ मिनिटांनी या विमानाने दिल्लीहून उड्डाण केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे विमान ९०० फूट खाली आलं. स्टिक शेकर अलार्मही झाला. ज्यानंतर वैमानिकाने हे विमान योग्य उंचीवर नेलं आणि उड्डाण सुरु ठेवलं. या घटनेत कुठलाही अपघात झाला नाही. तसंच कुठलीही जिवीत हानी झाली नाही. ९ तास ८ मिनिटांच्या उड्डाणानंतर हे विमान व्हिएन्नाला सुरक्षित पोहचलं. त्यानंतर या ठिकाणी वेगळा क्रू आला आणि त्यानंतर हे विमान टोरांटोला रवाना झालं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं?
दरम्यान DGCA ने या घटनेचं गांभीर्य ओळखून चौकशी सुरु केली आहे. वैमानिकाने स्टिक शेकर अॅक्टिव्ह झाल्याचंच त्याच्या अहवालात म्हटलं होतं. इतर काय इशारे आले होते ते त्याने लिहिलं नव्हतं. यामागचं कारण काय? याचाही तपास केला जातो आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, वैमानिकाने दिलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही या प्रकरणाची माहिती डीजीसीएला दिली. त्यानंतर विमानाच्या रेकॉर्डरमधून डेटा मिळाल्यानंतर पुढील तपास आम्ही सुरु केला.
१२ जूनची घटना काय?
१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेलं विमान अवघ्या काही मिनिटांत कोसळलं. या घटनेत विमानातल्या २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या हॉस्टेलमधल्या ३४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर विमानांची विशेष खबरदारी एअर इंडियाकडून घेतली जाते आहे.