Air India Dreamliner Technical Snag : गेल्या काही दिवसांपासून बोइंग कंपनीच्या विमानांमधील तांत्रिक बिघाडाच्या बातम्या, सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त करणारे अहवाल समोर येत आहेत. तसेच अहमदाबादमध्ये नुकतीच एक मोठी विमान दुर्घटना देखील घडली आहे. दरम्यान, आता एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-३१५ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हाँगकाँग विमानतळावरून उड्डाण केलेलं हे विमान तांत्रिक बिघाडामुळे माघारी परतलं आहे. हे देखील बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान आहे.
बोइंग ड्रीमलायनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने अशा घटना समोर येत आहेत. लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून चेन्नईसाठी उड्डाण केलेल्या ब्रिटीश एअरवेजच्या बोइंग ड्रीमलायनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान देखील हीथ्रोला परतलं आहे. तर फ्रँकफर्टवरून हैदराबादला निघालेल्या लुफ्यान्साच्या बोइंग ड्रीमलायरन विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर हे विमानदेखील फ्रॅन्कफर्टला परतलं आहे.
एअर इंडियाने या घटनेबाबत काय म्हटलंय?
दरम्यान, फ्लाइट एआय ३१५ बाबत एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की एआय-३१५ सुरक्षितपणे हाँगकाँग विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. विमानाची तपासणी केली जात आहे. विमानाने हाँगकाँगवरून दुपारी १२.१६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केलं होतं. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.२० वाजता हे विमान दिल्ली विमानतळावर उतरणार होतं. दरम्यान, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट flightradar24 च्या अहवालानुसार या विमानाने निश्चित वेळेपेक्षा ३.५ तास उशिराने उड्डाण केलं होतं. सकाळी ८.५० वाजता या विमानाचं उड्डाण निश्चित होतं.
जेद्दाह विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
दरम्यान, १५ जून रोजी सकाळी जेद्दाहवरून लखनौला जाणाऱ्या सौदी अरबच्या एका विमानाच्या चाकांमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर विमानतळावरील बचाव पथक व अग्निशमन दलाची पथकं धावट्टीवर गेली आणि त्यांनी धूर नियंत्रित केला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे. या घटनेचा विमानतळावरील विमानांच्या संचालनावर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, विमानाच्या चाकांमधून धूर येण्याचं कारण अद्याप सांगण्यात आलेलं नाही. विमानतळ प्रशासन किंवा विमान कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.