लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेसने संयुक्त अरब अमिराती (यूएई), ओमान आणि सौदी अरेबियासाठी विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. मुंबईसह देशातील अनेक शहरांमधून दररोज ४०हून अधिक विमानसेवा सुरू केल्या आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम आशियातील तणावामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने विमान सेवा थांबविण्यात आली होती. शस्त्रसंधीनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसने विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. एअरलाइनने ३० एप्रिलपासून कतार, बहारिनसाठी विमानसेवा आणि यूएई, ओमान आणि सौदी अरेबियासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई, दिल्ली, अमृतसर, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, कोची, कोझिकोड, कन्नूर, लखनऊ, मंगळुर, तिरुचिरापल्ली, तिरुवनंतपुरम आणि वाराणसी यांसह देशातील प्रमुख शहरांमधून विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, भारताला आखाती प्रदेशाशी जोडणारे प्रस्थापित मार्ग पुन्हा सुरू केल्यामुळे अल ऐन, अबूधाबी, दुबई, रास अल खैमा, शारजा, जेद्दा, रियाध आणि मस्कतसाठी विमानसेवा सुरू राहणार आहे. यापूर्वी, इंडिगोने १ मेपासून दोहासाठी आणि दोहाहून विमानसेवा पुन्हा सुरू केली. दरम्यान, भारतीय विमान कंपन्यांनी केंद्र सरकारला देशांतर्गत विमानसेवेसाठी विमान इंधनावरील ११ टक्के उत्पादन शुल्क तात्पुरते स्थगित करण्याची विनंती केली आहे.