एअर इंडियाचं एक विमान हवेत नियोजित मार्गावरून भरकटलं आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. २२ जून २०२६ रोजी रात्री ही घटना घडली असून दिल्लीवरून अमृतसरला हे विमान जात होतं. मात्र, हे विमान तांत्रिक बिघाडामुळे नियोजित मार्गावरून भरकटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. या घटनेची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी (२२ जून २०२६) रात्री २०० पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन दिल्लीवरून अमृतसरसाठी एअर इंडियाचं एक विमान रवाना झालं होतं. मात्र, अमृतसरमध्ये ‘गो-अराउंड’ (विमान उतरवण्याचा प्रयत्न थांबवून पुन्हा आकाशात झेप घेत असताना) प्रक्रिया करत असताना एअर इंडियाचं हे विमान काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं होतं, अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, एअर इंडियाचं हे विमान काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने इशारा देत विमानाला तात्काळ मागे फिरण्यास सांगितलं. त्यानंतर विमानाने लगेचच ‘यू-टर्न’ घेतला. या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणांना देण्यात आली असून आता या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

एअर इंडियाने निवेदनात काय म्हटलं?

“२२ जून रोजी दिल्ली ते अमृतसर या प्रवासादरम्यान ‘एआय ४७९’ हे विमान चालवणाऱ्या वैमानिकाकडून अमृतसर विमानतळावर ‘गो-अराउंड’ची प्रक्रिया करत असताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचं अंशतः उल्लंघन झालं. या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणांना देण्यात आली असून कंपनीकडून याची अंतर्गत चौकशी केली जात आहे”, अशी माहिती एअर इंडियाने एका निवेदनात दिली आहे. दरम्यान, प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं विमान कंपनीने म्हटलं आहे.

दरम्यना, हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून पुन्हा भारताच्या हवाई हद्दीत परतल्यानंतरही अडचणी संपल्या नाहीत. तोपर्यंत अमृतसर विमानतळावरील हवाई वाहतूक वाढली होती. त्यामुळे या विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर अखेर हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आलं आणि दिल्लीत सुरक्षितपणे उतरलं. या संपूर्ण घटनेदरम्यान दोन तासांचा वेळ गेला. त्यानंतर या विमानाला पुन्हा अमृतसरकडे उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आणि अखेरीस सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री साधारणपणे २:२० वाजता ते अमृतसर विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवाशांना सुमारे चार तासांच्या विलंबाचा सामना करावा लागला.