Air India flight emergency landing Jaipur : फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान १४ ऑक्टोबर रोजी सुरक्षेच्या कारणास्तव जयपूरकडे वळवण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असून, तेथे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरू केली आहे. या विमानात ३०६ प्रवासी प्रवास करत होते. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.
बोईंग ७८७-९ विमानाद्वारे चालवले जाणारे हे ‘AI2030’ विमान उतरल्यानंतर सुरक्षा तपासणीसाठी आयसोलेशन बे (स्वतंत्र ठिकाणी) मध्ये नेण्यात आले. मालवीय नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिव दयाल यांनी पीटीआयला सांगितलं की, विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने पोलिसांना दिली होती.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजन (FIR) मध्ये असताना वैमानिकाने ‘स्कॉक कोड ७५००’ (Squawk Code 7500) सक्रिय केला होता, जो विमानामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप (अपहरण किंवा तत्सम धोका) झाल्याचं दर्शवतो. वैमानिकाकडून चुकीने हा संदेश देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीखाली प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीत नेण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही.”
