Air India : एअर इंडियाकडून एक मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या एका विमानाने दिल्लीहून व्हँकुवरला जाण्यासाठी उड्डाण केलं. त्यानंतर हे विमान चीनजवळ पोहोचलं. मात्र, त्यानंतर अचानक या एअर इंडियाच्या या विमानाला पुन्हा दिल्लीला परतावं लागलं आहे. त्यामुळे विमानातील प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

एअर इंडियाच्या एका आंतरराष्ट्रीय विमानात धक्कादायक चूक घडली आहे. दिल्लीहून कॅनडातील व्हँकुवरला जाणाऱ्या विमानाला पुन्हा अचानक हवेतून परत दिल्लीला परतावं लागलं आहे. कारण जे विमान कॅनडातील व्हँकुवरच्या दिशेनं निघालं होतं, त्या विमानाला कॅनडात उड्डाण करण्याची परवानगीच नव्हती. त्यामुळे या चुकीमुळे तब्बल ९ तास हे विमान हवेत राहिलं आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीत परतलं.

एअर इंडियाचं हे हे विमान गुरुवारी सकाळी ११:३४ वाजता दिल्लीहून निघालं होतं. त्यानंतर चार तासांनंतर हे विमान चीनमधील कुनमिंगजवळ पोहोचल्यानंतर एअरलाइन्सच्या लक्षात आलं की या विमानाला कॅनडामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. त्यानंतर तातडीने हे विमान हवेतूनच परत बोलावण्यात आलं. त्यामुळे परतीचा प्रवास आणि जाताना लागलेला वेळ असं जवळपास ९ तास हे विमान हवेत राहिलं. मात्र, सायंकाळी अखेर हे विमान दिल्लीत सुखरूप परतलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

नेमकं चूक काय घडली?

माहितीनुसार, या उड्डाणासाठी बोईंग ७७७ -२०० LR या विमानाचा वापर करण्यात आला. मात्र, कॅनडात एअर इंडियाच्या बोईंग ७७७ २०० लाँग रेंज विमानांना परवानगी नाही. तर एअर इंडियाच्या बोईंग ७७७-३०० ER ताफ्यातील विमानांना कॅनडात परवानगी आहे. त्यामुळे ही चूक घडली.

दरम्यान, वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वेगवेगळे नियम असतात. काहीवेळा विमानाचं मॉडेल किंवा त्याच्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारावर परवानगी दिली जाते. यामुळेच ही तांत्रिक त्रुटी उद्भवली असल्याचं सांगितलं जात आहे.