पीटीआय, नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’ने रशियाची राजधानी मॉस्कोत जाणारी सर्व विमान उड्डाणे स्थगित केली आहेत. विमा कंपन्यांनी येथील सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केल्याने टाटा समूह संचालित ‘एअर इंडिया’ने हा निर्णय घेतला व या प्रश्नी केंद्र सरकारला हस्तक्षेपाचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी ‘एअर इंडिया’ला कळविले, की रशियात जाणाऱ्या विमानांना विमा संरक्षण देता येणार नाही. युक्रेन-रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे असुरक्षितता निर्माण झाली आहे. ही माहिती या घडामोडींशी संबंधित दोन व्यक्तींनी खात्रीलायकरित्या दिली. यापेकी एकाने सांगितले, की मॉस्कोची विमानवाहतूक लवकरात लवकर सुरळीत सुरू व्हावी, यासाठी ‘एअर इंडिया’ने भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

‘एअर इंडिया’च्या प्रवक्त्याने दिलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे, की ७ एप्रिल रोजी दिल्ली-मॉस्को-दिल्ली ही विमान वाहतूक ‘एअर इंडिया’ने रद्द केली आहे. मात्र, ‘फ्लाईट रडार २४’ या विमान वाहतुकीची माहिती देणाऱ्या ‘वेब पोर्टल’नुसार दिल्ली-मॉस्को मार्गावर रविवारी आणि गुरुवारी होणारी वाहतूक रद्द करण्यात आली. त्यामुळे रविवारीही (३ एप्रिल) मॉस्कोला भारतातून विमान गेले नव्हते.

रशियामार्गे विमान वाहतूक सुरू राहणार

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियाच्या विमानवाहतुकीवर बंदी घातली आहे. रशियाला होणारी युरोपियन आणि अमेरिकन विमान वाहतूक ठप्प आहे. परदेशांतून जाणाऱ्या विमानमार्ग वापरण्यासही रशियाला बंदी आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या काही विमान कंपन्यांसह केवळ भारताच्या ‘एअर इंडिया’ची रशियाला विमानवाहतूक सुरू होती. अमेरिका आणि कॅनडाने रशियामार्गे विमानवाहतूक थांबवली असताना ‘एअर इंडिया’ची अमेरिकेला होणारी विमानवाहतूक रशियामार्गे सुरू होती. विमा कंपन्यांनी रशियात विमान उतरवण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रशियामार्गे अमेरिकेस जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानवाहतुकीस त्यांचा आक्षेप नसल्याने, ही वाहतूक सुरळीत सुरू राहील.